प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
वाशीमध्ये जागतिक चिमणी दिवस उत्साहात साजरा
नवी मुंबई : ‘दिव्या वैभव गायकवाड फाऊंडेशन'च्या वतीने वाशी, सेक्टर-१ ते ६ ट्री बेल्ट परिसरात जागतिक चिमणी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे शहरी भागातून झपाट्याने कमी होत चाललेल्या चिमण्यांच्या संरक्षणाबाबत जनजागृती करणे होता.
कार्यक्रमादरम्यान चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी, पाणी पिण्याची भांडी तसेच दाणे ठेवण्यासाठी भांडी लावण्यात आली. यामुळे उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पक्ष्यांना सुरक्षित आणि अनुकूल वातावरण उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवून पर्यावरण संवर्धनासाठी आपली बांधिलकी दर्शवली.
काँक्रीटच्या इमारतींमुळे घरटी बांधण्यास जागा नाही, मोबाईल टॉवर्समधील किरणोत्सर्ग, अन्नसाखळीचा अभाव, किटकनाशकांचा अति वापर, पाण्याची टंचाई यामुळे दोन दशकात भारतातील शहरांमध्ये चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून एकेकाळी सहज दिसणारी चिमणी आज दुर्मिळ होत चालली आहे. काही तज्ञांच्या मते शहरी भागात चिमण्यांची संख्या ५० टक्के पेक्षा अधिक कमी झाली आहे
चिमणी केवळ एक पक्षी नसून पर्यावरणीय समतोल ठेवण्यातील एक महत्वाचा घटक आहे. किटक नियंत्रणात राहिल्याने शेतीला त्याचा फायदा होतो, तसेच जैवविविधतेचे संतुलन राखले जाते. जर सदर स्थिती अशीच राहिली तर शहरांमधून चिमण्या पूर्णपणे नामशेष होण्याचा धोका असून, नैसर्गिक किटक नियंत्रण कमी होऊन पर्यावरणीय समस्या वाढू शकतात. पुढील पिढीला चिमणी केवळ पुस्तकातच पहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी नागरिकांनी घराच्या गच्चीवर, बाल्कनीत कृत्रिम घरटी लावणे, उन्हाळ्यात त्यांच्यासाठी पाण्याची भांडी ठेवणे, धान्य-दाणे नियमित ठेवणे, झाडे लावून नैसर्गिक अधिवास तयार करणे, रासायनिक किटकनाशकांचा कमी वापर करावा, असे आवाहन या उपक्रमातून नगरसेविका दिव्या गायकवाड आणि पक्षीप्रेमींनी केले आहे.