साठेनगरमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य

भिवंडीः ऐन उन्हाळ्यात शहरातील साठेनगरमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने पाणीटंचाई सुरु झाली असून नागरिक पाण्यासाठी वणवण करताना दिसून येत आहेत. या गंभीर समस्येची महापालिकेकडे तक्रार करुनही प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.

टेकडीभागातील साठेनगर रहिवाशांची पिण्याच्या पाण्याची समस्या अनेक वर्षांपासूनची होती. मात्र, २ वर्षांपूर्वी  नवीन पाईपलाईन टाकल्याने पाणीपुरवठा समाधानकारक होत असे. दरम्यानच्या काळात येथील पाणीपुरवठा अन्य ठिकाणी वळविल्याने पुन्हा पाणी टंचाई निर्माण होऊ लागली आहे. एप्रिल महिन्यात १८ ते १९ एप्रिल रोजी २४ तासांकरिता येथील पाणीपुरवठा खंडीत करण्यात आला होता. १९ एप्रिल रोजी पाणीपुरवठा पूर्ववत होऊन देखील साठेनगर भागात अनेक दिवस पाणी येत नसल्याच्या साठेनगर मधील रहिवाशांच्या तक्रारी वाढल्या आहेत.

गेले १५-२० दिवसपासून पाणी समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे याबाबतची माहिती महापालिका प्रभाग समिती ४ मधील पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना सांगितली आणि लेखी तक्रारी केल्याचीही माहिती नागरिकांनी दिली. साठेनगर येथील पाणी ओसवालवाडीतील इमारतींना वळवले जात असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला असून पाईपलाईनही अनेक ठिकाणी फुटली आहे. तसेच साठेनगरमध्ये काही रहिवाशांनी थेट नळजोडणी घेतल्याने पाण्याची कमतरता जाणवत असल्याचेही नागरिकांनी सांगितले. त्यामुळे महिलांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

कधी तरी नळाला पाणी आले तर ते  गढूळ येते. तर काही वेळा टाकीतील पाण्यामध्ये अळ्या देखील आढळून आल्या आहेत. त्यामुळे साठेनगर मधील नागरिकांना अनेक आजारांचा धोका असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली. दरम्यान, नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी महिला मंडळांनी आणि पक्ष कार्यकर्त्यांनी लेखी पत्राद्वारे महापालिका प्रशासनाकडे केली आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

4 महिन्यांपासून पगाराला विलंब