प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
उरण नगराध्यक्षपदी ‘महाविकास आघाडी'च्या भावना घाणेकर
उरण : ‘उरण नगरपरिषद'च्या २ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीचा धक्कादायक निकाल लागला असून ‘महाविकास आघाडी'मधील ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष'च्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावना घाणेकर याना ९२१० मते पडली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी ‘भाजपा'च्या शोभा कोळी यांना ७७४० मते मिळाली. या निवडणुकीत भावना घाणेकर यांचा १४७० मताधिक्याने विजय झाला.
निवडणुकीत ‘महाविकास आघाडी'चे ९ उमेदवार तर ‘भाजपा'चे १२ उमेदवार नगरसेवक पदी निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. उध्दव कदम यांनी जाहीर केले. त्यामुळे ‘महाविकास आघाडी'मध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘उरण नगरपरिषद'साठी २१ नगरसेवक आणि १नागराध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया २ डिसेंबर रोजी पार पडली. त्यावेळी ३ डिसेंबरला होणारा नगरपरिषद-नगरपालिका निवडणुकींचा निकाल नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयाने पुढे ढकलल्याने या निवडणुकांची २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला. या निकालामध्ये ‘उरण नगरपरिषद'च्या नगराध्यक्ष पदी ‘महाविकास आघाडी'च्या शरदचंद्र पवार गटाच्या भावना घाणेकर या १४७० मतांनी निवडून आल्या. त्यांच्यासोबत ‘महाविकास आघाडी'चे उमेदवार विक्रम म्हात्रे (प्रभाग २ब), वंदना पवार (प्रभाग ३ अ), अमित म्हात्रे (प्रभाग ३ ब), अतुल ठाकूर (प्रभाग 4 अ), प्रमिला पवार (प्रभाग ४ ब), नाहिदा ठाकूर (प्रभाग ५अ), मंगेश कासारे (प्रभाग ६अ), तनिषा पाटील (प्रभाग ६ ब), प्रार्थना म्हात्रे (प्रभाग ७ अ) असे ९ जण नगरसेवक पदी निवडून आले आहेत.
तर ‘भाजपा'चे रजनी कोळी (प्रभाग १ अ), जयविंद्र कोळी (प्रभाग २ अ), रिबेका मढवी (प्रभाग ५ ब), जसीन गॅस (प्रभाग ७ ब), रवि भोईर (प्रभाग ८ अ), पूर्वा वैवडे, ॲड. रोहित कोळी (प्रभाग ९ अ), गणेश पाटील, सायली पाटेकर (प्रभाग १०), राजेश ठाकूर, सायली म्हात्रे, दमयंती म्हात्रे असे नगरसेवक पदी निवडून आले आहेत.
दरम्यान, ‘उरण नगरपरिषद'च्या निवडणुकीमध्ये ‘भाजपा'साठी गड आला; पण सिंह गेला, असे बोलले जात आहे.
‘उरण नगरपरिषद'च्या निवडणुकीत ‘महाविकास आघाडी'च्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावना घाणेकर आणि ९ नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी झाल्याने ‘राष्ट्रवादी'चे ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा, माजी आमदार मनोहर भोईर, माजी आमदार बाळाराम पाटील, ‘काँग्रेस'चे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, ‘काँग्रेस'चे ज्येष्ठ नेते मिलिंद पाडगांवकर, ‘शेकाप'चे तालुका चिटणीस रवि घरत, विनोद म्हात्रे, महिला जिल्हाध्यक्षा रेखा घरत, सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करुन जल्लोष केला आहे.