चाविंद्रा डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याची मागणी

भिवंडी : भिवंडी महापालिका क्षेत्रातील जमा होणारा ४०० टन कचरा टाकल्या जाणाऱ्या चाविंद्रा येथील डम्पींग ग्राऊंड तत्काळ बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

चाविंद्रा रामनगर या रस्त्यावर महापालिकेची शाळा क्रमांक-४६ च्या समोर चाविंद्रा सिटी पार्कसाठी आरक्षित भूखंडावर लोकवस्ती लगत सुरु असलेल्या डम्पींग ग्राऊंडमुळे दुर्गंधी आणि धुरामुळे येथील चाविंद्रा, गायत्रीनगर, पोगाव, नागाव आणि सभोवताली असणाऱ्या नागरी वस्तीत राहणारे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे येथील डम्पींग ग्राऊंड तात्काळ बंद करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने सुरेश यशवंत पाटील, राम पाटील, संदीप पाटील, तेजस पाटील, देव पाटील, सुरेश मोतीराम पाटील, अनंता पाटील यांच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे महापालिका आयुक्त अनमोल सागर आणि उपविभागीय अधिकारी अमित सानप यांच्या कडे केली आहे.

महापालिका क्षेत्रातील मौजे चाविंद्रा, पोगाव गायत्रीनगर आणि सभोवताली असणाऱ्या येथील स्थानिक ग्रामस्थ जन्मापासून येथे वास्तव्यास आहोत. त्यापैकी बहुतांश येथील शेतजमिनीवर आपली उपजीविका करीत आहेत. तर या डम्पिंग ग्राऊंड लगत वनखात्याच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी बसलेली आहे. येथील लोकसंख्या ३० हजार हून अधिक आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पायाभूत आणि नागरी सुविधा देणे महापालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. असे असताना येथील सिटी पार्कसाठी आरक्षित भूखंडावर कचरा साठविणे येथील जनतेवर अन्याय करणारे आहे, असे निवेदनात नमूद करीत सदर डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याचे भव्य ढिगारे उभे राहिले आहेत. या कचऱ्यामधील प्लॅस्टिक, ज्वलनशील कचरा, केमिकलयुक्त कचरा जळल्याने नागरिकांना उग्र वास, दुर्गंधी यासह श्वसनाचा त्रास होत आहे.

याशिवाय सदर कचऱ्याच्या ढिगाऱ्यासमोर महापालिकेची प्राथमिक शाळा असून शाळेतील विद्यार्थ्यांना दुर्गंधीमुळे शिक्षण घेणे कठीण झाले आहे. येथील ढिगाऱ्यातील कचरा आमच्या मालकीच्या शेतात पसरल्याने शेत जमीन नापिक होऊन नुकसान होत आहे. या विरोधात स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि समाजसेवकांनी तोंडी आणि लेखी तक्रारी दिल्या असून याबाबत महापालिकेचे तत्कालीन आयुक्त, महापौर आणि प्रशासक यांची भेट घेऊन डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याची मागणी केली आहे. मात्र, महापालिका प्रशासन वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला आहे.

दरम्यान, सदर गंभीर प्रश्नावर महापालिका प्रशासनाने ७ दिवसात निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने डम्पिंग ग्राऊंड विरोधात तीव्र विरोध आंदोलन करु, असा इशारा सुरेश यशवंत पाटील यांनी दिला आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नाट्यगृहाच्या उद्‌घाटनापूर्वी पुनर्वसनाची मागणी