चिरनेर जंगल सत्याग्रहाचा स्मृती दिन साजरा

उरण : १९३० च्या चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या लढ्याचा ९५ वा हुतात्मा स्मृतीदिन कार्यक्रम चिरनेर येथे २५ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला. यावेळी उरण पोलिसांच्या वतीने हुतात्मा स्मृती स्तंभासमोर बंदुकीच्या फैरी झाडून आणि बिगुल वाजवून हुतात्म्यांच्या स्मृतींना शासकीय मानवंदना देण्यात आली. परंतु, देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृतीदिन कार्यक्रमाकडे ना. भरत गोगावले यांनी पाठ फिरवल्याने नागरिकांच्या मनात नैराश्याची भावना उमटू लागली आहे.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सविनय कायदेभंग आंदोलनातंर्गत २५ सप्टेंबर १९३० रोजी चिरनेर येथे जंगल सत्याग्रह करण्यात आला होता. या सत्याग्रहातील आंदोलनकर्त्यांवर जुलमी ब्रिटीश पोलिसांनी निदर्यपणे बेछुट गोळीबार केला. या गोळीबारात धाकू गवत्या फोफेरकर, नाग्या महादू कातकरी (चिरनेर), रामा बामा कोळी (मोठी जुई), हसुराम बुधाजी घरत (खोपटे), मोरेश्वर रघुनाथ शिंदे उर्फ न्हावी (कोप्रोली), परशुराम रामजी पाटील (पाणदिवे), आनंदा माया पाटील (धाकटी जुई), आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे) आदि ८ आंदोलनकर्ते धारातिर्थी पडले. या हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी २५ सप्टेंबर रोजी हुतात्मा स्मृती दिन कार्यक्रम ‘मावळ'चे खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.या कार्यक्रमाचे औचित्य साधून हुतात्म्यांच्या वारसांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत दादा ठाकूर, माजी आमदार मनोहर भोईर, बाळाराम पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ‘काँग्रेस'चे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, उद्योजक पी. पी. खारपाटीर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, उद्योजक राजाशेठ खार पाटील, जिल्हा अध्यक्ष अतुल भगत, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, ‘मनसे'चे तालुकाध्यक्ष अँड सत्यवान भगत, शेकाप तालुका चिटणीस रवी घरत, काँग्रेस तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, धनेश गावंड, तहसीलदार डॉ उध्दव कदम, सहा. पोलीस आयुक्त किशोर गायके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हानिफ मुलानी, कामगार नेते भूषण पाटील, सुधाकर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप परदेशी, तालुका अध्यक्ष दिपक ठाकूर, रमेश म्हात्रे, संजय ठाकूर यांच्यासह इतर विविध पक्षांच्या पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली.

यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत ‘चिरनेर गांव'चे सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच अरुण पाटील, ग्रामविकास अधिकारी रवींद्र गावंड आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी केले.

दरम्यान, चिरनेर हुतात्म्यांच्या बलिदानातून पावन झालेली भूमी आहे. अशा निसर्गरम्य परिसराचा कायापालट होत नसेल तर ती शोकांतिका आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने हुतात्म्यांच्या ऐतिहासिक प्रसिध्द चिरनेर गावाला ‘अ' दर्जाचे पर्यटनस्थळ जाहीर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी या परिसरातील नागरिकांची मागणी असल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘सिडको'च्या खारघर मधील भूखंडाला सर्वाधिक बोली