प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
तीन आठवड्यांपासून उघड्यावर संसार थाटलेल्या नागरीकांचा अंबरनाथ नगर परिषदेवर मोर्चा
अंबरनाथः शिवमंदिर कॉरिडॉर प्रकल्पाच्या सुशोभीकरणासाठी घर तोडल्यामुळे गेल्या तीन आठवड्यांपासून उघड्यावर संसार थाटलेल्या एकता नगरमधील ३१ कुटुंबांनी २ एप्रिल रोजी अंबरनाथ नगर परिषदेवर जनआक्रोश मोर्चाकाढला.
या दबावानंतर प्रशासनाने रहिवाशांना हक्काचे घर देण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. प्राचीन शिवमंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी ‘शिवमंदिर कॉरिडॉर' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत असताना ११ मार्च रोजी उल्हासनगर मधील एकतानगर येथील ३१ घरे जमीनदोस्त करण्यात आली होती. गेल्या चार दशकांहून अधिक काळ येथे वास्तव्यास असलेल्या या कुटुंबांना कोणताही पर्याय न देता बाहेर काढल्याने महिलांना आपल्या लहान मुलांसह गटाराच्या काठावर आणि उघड्या आकाशाखाली रात्री काढाव्या लागत होत्या. एकीकडे शासन महिला सक्षमीकरणाच्या घोषणा देत असताना दुसरीकडे या ‘लाडक्या बहिणीं'चा संसार मातीमोल झाल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत होता. उल्हासनगर महापालिका आणि अंबरनाथ नगरपरिषद यांच्यातील प्रशासकीय टोलवाटोलवीत प्रकल्पग्रस्त रहिवासी भरडले जात असल्याने, आज शेवटी मोठ्या संख्येने नागरिकांनी नगरपरिषदेवर धडक देऊन प्रशासनाला जाब विचारला.
रहिवाशांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर अंबरनाथ नगरपरिषद प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत रहिवाशांना लेखी पत्र दिले आहे. या पत्राद्वारे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, बाधित झालेल्या ३१ कुटुंबांचे तात्काळ बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण केले जाईल आणि सर्वेक्षणात पात्र ठरणा़र्या सर्व कुटुंबांना अंबरनाथमधील ‘बीएसयूपी' गृहप्रकल्पांतर्गत हक्काची सदनिका उपलब्ध करून दिली जाईल. जोपर्यंत घरांचे प्रत्यक्ष वाटप होत नाही, तोपर्यंत रहिवाशांच्या निवाऱ्याबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासनही मुख्याधिकाऱ्यांनी दिले आहे. प्रशासनाच्या या ठोस भूमिकेमुळे बेघर झालेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून, आता या आश्वासनाची अंमलबजावणी कधी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.