नवी मुंबई मध्ये पावसाचा जोर; सखल भाग जलमय
वाशी : पावसाने चार दिवस उसंत घेतल्यानंतर नवी मुंबई शहरात १३ सप्टेंबर पासून पावसाचा जोर वाढला आहे. १४ सप्टेंबर रोजी रात्री नवी मुंबई शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर १५ सप्टेंबर रोजीही कायम होता. त्यामुळे १५ सप्टेंबर रोजी नवी मुंबई शहरातील सखल भागात पाणी साचण्याचे प्रकार घडले. वीजा आणि ढग यांच्या कडकडाटात पाऊस बरसत होता. तर रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता. या पावसामुळे सीवूड्स सेवटर-४८ येथील सागर सोसायटी समोर मोठे वृक्ष उन्मळून पडण्याची घटना घडली. मात्र, घटनास्थळी अग्निशमन दल जवानांनी जाऊन तत्काळ पडलेले झाड हलवले.
पावसामुळे नवी मुंबई शहरातील भुयारी मार्गात पाणी साचले होते. कोपरखैरणे भुयारी मार्गात असणाऱ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांची खड्डे चुकवावे की पाण्यातून वाहन चालवावे, अशी द्विधा परिस्थिती निर्माण झाली होती. तुर्भे एमआयडीसी भागातील बगाडे कंपनी समोरच्या रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे येणाऱ्या- जाणाऱ्या गाड्यांना पाण्यातून वाट काढत जाताना नाकी नऊ येत होते. दुपार नंतर पावसाने थोडी विश्रांती घेतली तरी आभाळ भरुन आले होते. वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) भाजीपाला आणि फळ मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पाण्यातून वाट काढत व्यापारी वर्गाला चालावे लागले. मॅफको मार्केटचा रस्त्यापासून ते एपीएमसी मार्केटचा पूर्ण परिसर जलमय झाला होता. रस्त्यावर तुडुंब प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना या पाण्यातून पायवाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत होती.पावसाच्या संततधारेने वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) बाजार आवारात तसेच मुख्य प्रवेशद्वारावर पाणीच पाणी झाले होते. त्याचबरोबर कांदा बटाटा बरोबर पाचही बाजारात जागोजागी पाणी साचले होते. एपीएमसी बाजार समिती मुख्य रस्त्यालगत आहे. मुख्य रस्त्यावरील नाले, गटारे उंच भागात आहेत. तर बाजार परिसर सखल भागात आहे. एपीएमसी बाजारातील मलनिस्सारण वाहिन्या, चेंबर व्यवस्थित साफ न केल्याने एपीएमसी बाजाराच्या मुख्य प्रवेशद्वारात आणि परिसरात पाणी साचले होते. हे पाणी साचले आहे. बाजारात नाल्याची सफाई योग्यरीत्या झाली नसल्याने बाजार आवारात ठिकठिकाणी पाणी साचले होते. एपीएमसी बाजार आवारात पावसाचे पाणी साचल्याचा मोठा फटका व्यापारांना बसला आहे.
एकूण सरासरी पाऊस
बेलापूर - १५९.६० मिमी
नेरुळ - १३८.६० मिमी
वाशी - ९७.४० मिमी
कोपरखैरणे - ८०.२० मिमी
ऐरोली - ७४.६० मिमी
दिघा - ५४.४० मिमी
एकूण - १००.८० मिमी
१ जून पासून ते १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत नवी मुंबई शहरात एकूण २९१७.८९ मिमी पाऊस पडला आहे. तर मोरबे धरण परिसरात १५ सप्टेंबर पर्यंत १०५.६० मिमी पाऊस पडला असून, १ जून पासून १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत ३६८०.२० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे, अशी माहिती महापालिका आपत्कालीन विभाग तर्फे देण्यात आली.