महाराष्ट्र सरकारने नवीन फौजदारी कायदे तातडीने लागू करावेत -गृहमंत्री अमित शाह
कोल्ड प्ले कार्यक्रमासाठी ३ दिवस चोख पोलीस बंदोबस्त
नवी मुंबई : नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम १८, १९ आणि २१ जानेवारी रोजी जागतिक दर्जाच्या कोल्ड प्ले या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कार्यक्रमासाठी प्रत्येक दिवशी सुमारे ४५ हजार प्रेक्षक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कार्यक्रमादरम्यान, कुठल्याही प्रकारची अनुचित घटना तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नवी मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. त्याशिवाय वाहतूक पोलिसांनी देखील वाहतूक कोंडी होऊ टाळण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे.
कोल्ड प्ले कार्यक्रमाच्या प्रत्येक दिवशी स्टेडियमच्या आतमध्ये १ पोलीस उपायुक्त, ७० पोलीस अधिकारी, ४३४ पोलीस अंमलदारांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त स्टेडियमचा बाहेरील परिसर आणि नवी मुंबई परिसरामध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी १ पोलीस उपायुक्त, २१ पोलीस अधिकारी, ४४० पोलीस अंमलदार असा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाच्या कालावधीत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये वाहतूक कोंडी होवू नये यासाठी उरण, न्हावाशेवा, पुणे, ठाणे तसेच मुंबईकडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना कार्यक्रम असलेल्या तीन्ही दिवशी दुपारी २ ते रात्री ११ वाजेपर्यंत प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
‘कोल्ड प्ले'च्या तिन्ही दिवशी डी. वाय. पाटील स्टेडियमच्या आजुबाजुच्या परिसरात, एलपी ब्रीज सिग्नल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच शनिमंदिर कमान ते भीमाशंकर चौक या परिसरात वाहनांना प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच सदर भागात नो-पार्कींग झोन घोषित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे इंडीयन ऑईल टर्मिनल सर्व्हिस रोड ते रहेजा कॉर्नर, शिवाजीनगर ते पुण्यनगरी पर्यंतचा मार्ग देखील नो-पार्कींग झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. सदर मार्गावरील वाहनांसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनधिकृत पार्कींग हटविण्याकरिता तसेच अपघात घडल्यास तत्काळ वाहने रस्त्यावरुन बाजुला काढण्यासाठी १७ टोईंग क्रेन सज्ज ठेवण्यात आले आहेत.
कार्यक्रमाला येणाऱ्या प्रेक्षकांच्या वाहनांसाठी नेरुळ मधील तेरणा ग्राऊंड, तुळशी मैदान, सीबीडी-बेलापूर पाकर्िंग सेक्टर-१५ मधील महापालिकेचे पार्कींग, तुर्भे येथील युनिव्हर्सल, माईंड स्पेस, खारघर येथील बीडी सोमानी स्कुल तसेच सेक्टर-३२ मधील फुटबॉल गाऊंड या ठिकाणी पार्कीगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी खाजगी बसेसची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ओला, उबेर आणि खाजगी टॅक्सीकरिता माईडस्पेस आणि भिमाशंकर मैदान या ठिकाणी पिकअपची व्यवस्था करण्यात आली आहे.
खाजगी कार्यक्रमासाठी पोलीस बंदोबस्ताचे पैसे कोण देणार?
नेरुळ मधील डी. वाय. पाटील स्टेडियमवर यापूर्वी भरवण्यात आलेल्या ‘आयपीएल'च्या क्रिकेट सामन्यांना देखील नवी मुंबई पोलिसांनी बंदोबस्त पुरवला होता. मात्र, ‘आयपीएल'ने तसेच डी. वाय. पाटील स्टेडियम व्यवस्थापनाने पोलीस बंदोबस्ताचे पैसे थकवले होते. त्यामुळे पोलिसांना बंदोबस्ताचे पैसे मिळवण्यासाठी हातपाय पसरावे लागले होते. तसेच कोल्ड प्ले या खाजगी कार्यक्रमासाठी देखील पोलिसांनी ३दिवस मोठा फौजफाटा तैनात केला आहे. मात्र, या कार्यक्रमाच्या आयोजकांकडून पोलीस बंदोबस्ताचे पैसे देण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले. तसेच डी. वाय. पाटील स्टेडियमने देखील यापूर्वीचे बंदोबस्ताचे पैसे भरल्याचे उपायुवत पंकज डहाणे यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान होणाऱ्या अंमली पदार्थाच्या खरेदी-विक्रीवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून त्यासाठी साध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ब्लॅक मार्केटींग द्वारे या कार्यक्रमाच्या बनावट तिकीटाची विक्री करणाऱ्यांवर देखील विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे कुणीही अंमली पदार्थ घेऊन येण्याचा प्रयत्न करु नये. तसेच ब्लॅक मार्केटींग द्वारे तिकीट खरेदी करु नये. कार्यक्रमादरम्यान अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ स्थानिक पोलिसांना अथवा ११२ या पोलीस मदत क्रमांकावर माहिती कळवावी.
-पंकज डहाणे, पोलीस उपायुवत-परिमंडळ-१, नवी मुंबई.
कोल्ड प्ले कार्यक्रमादरम्यान वाहतूक कोंडी होवू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली असून त्यासाठी ४५० पेक्षा अधिक वाहतूक पोलीस अधिकारी-कर्मचारी तसेच ४०० वॉर्डन तैनात करण्यात आले आहेत. त्याशिवाय कार्यक्रमाच्या तिन्ही दिवशी जड-अवजड वाहनांना दुपारी २ ते रात्री ११ वाजेपर्यंत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. कार्यक्रमाला येणाऱ्या प्रेक्षकांच्या सोयीसाठी नेरुळ, बेलापूर आणि खारघर या परिसरामध्ये पार्कींगची व्यवस्था करण्यात आली आहे.
-तिरुपती काकडे, पोलीस उपायुवत-वाहतूक विभाग, नवी मुंबई.