प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
अतिधोकादायक एपीएमसी कांदा-बटाटा बाजार आवारात जाहिरात फलक उभारणी?
वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) बाजार आवारातील संपूर्ण कांदा-बटाटा मार्केट नवी मुंबई महापालिका तर्फे अतिधोकादायक घोषित केले असतानाही आता मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने एपीएमसी बाजार आवारात जाहिरात फलक लावण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच एपीएमसी कांदा- बटाटा बाजार आवारात जाहिरात फलक झळकणार असून, उर्वरीत इतर बाजार आवारात देखील जाहिरात फलक लावण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
१९८२ साली वाशी मधील तुर्भे परिसरात मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती आवारातील इमारती उभारण्यात आल्या आहेत. मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती आवारातील १७५ एकर जागेवर कांदा-बटाटा, मसाला, धान्य, फळ आणि भाजी मार्केट आदी पाच बाजार आवार असून, रोज या ठिकाणी हजारो वाहनातून शेतमालाची आवक-जावक होते. मात्र, बांधकाम केल्यानंतर अवघ्या २० वर्षातच मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती आवारातील इमारतींची पडझड होण्यास सुरुवात झाल्याने नवी मुंबई महापालिकेने वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती आवारातील इमारती धोकादायक घोषित करण्यास सुरुवात केली आहे. महापालिका तर्फे संपूर्ण एपीएमसी कांदा-बटाटा मार्केट (सी-१) मधील इमारती अतिधोदायक श्रेणीत टाकण्यात आल्या असून, या इमारतींमध्ये रहिवास, वाणीज्यिक वापर करण्यास मनाई आहे. मात्र, दरवर्षी एपीएमसी कांदा-बटाटा मार्केट (सी-१) मधील अतिधोकादायक इमारतींना नवी मुंबई महापालिका तर्फे नोटीस पाठवण्याचे सत्र कायम आहे. त्यामुळे एपीएमसी कांदा-बटाटा मार्केट (सी-१) मधील इमारती अतिधोकादायक असताना एपीएमसी प्रशासनाने या ठिकाणी जाहिरात फलक लावण्यास परवानगी दिली असून, इतर बाजार आवारात देखील जाहिरात फलक लावण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.
जाहिरात फलकांसाठी झाडांच्या फांद्यावर कुऱ्हाड?
वाशी मधील एपीएमसी कांदा-बटाटा बाजार आवारात जाहिरात फलक लावण्यात येत आहेत. या जाहिरात फलकांवरील जाहिराती स्पष्ट दिसण्यासाठी एपीएमसी कांदा-बटाटा बाजार आवारातील झाडांच्या फांद्यांवर कुऱ्हाड चालवण्यात आली आहे. नवी मुंबई शहरात धोकादायक आणि अनावश्यक झालेल्या झाडांच्या फांद्या छाटण्याची परवानगी नवी मुंबई महापालिका उद्यान विभाग तर्फे देण्यात येते. मात्र, एपीएमसी कांदा-बटाटा बाजार आवारातील जाहिरात फलक स्पष्ट दिसावेत याकरिता महापालिका उद्यान विभाग तर्फे झाडांच्या फांद्यांना धोकादायक श्रेणीत टाकण्यात आल्याने एपीएमसी बाजार आवारातील व्यापाऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वाशी मधील एपीएमसी कांदा-बटाटा बाजार आवारात जाहिरात फलक लावण्यासाठी जागा भाड्याने देण्यात आली आहे. याबाबत एपीएमसी संचालक मंडळाच्या बैठकीत रितसर ठराव संमत करुन परवानगी देण्यात आलेली आहे.तसेच नवी मुंबई महापालिका परवाना विभाग तर्फे देखील एपीएमसी कांदा-बटाटा बाजार आवारात जाहिरात फलक लावण्यासाठी परवाना देण्यात आला आहे. - मेहबूब व्यापारी, अभियंता - एपीएमसी कांदा-बटाटा मार्केट, वाशी.
वाशी मधील एपीएमसी कांदा-बटाटा बाजार आवारातील सर्व इमारती नवी मुंबई महापालिका तर्फे अतिधोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एपीएमसी कांदा-बटाटा बाजार आवारात जाहिरात फलक लावण्यात काही अनियमितता आढळून आली तर चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे. - डॉ. कैलास गायकवाड, उपायुक्त (अतिक्रमण) - नवी मुंबई महापालिका.