महापालिका तर्फे २४ ठिकाणी ‘वेस्ट टू आर्ट' शिल्पांची उभारणी
पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छता ही सेवा २०२५' अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत महापालिका क्षेत्रातील सर्व २० प्रभागांमध्ये एकूण २४ ठिकाणी ‘वेस्ट टू आर्ट'च्या माध्यमातून विविध शिल्पे, वेगवेगळ्या कलाकृतींची उभारणी करण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत स्वच्छता निरीक्षकांनी कचऱ्यातील रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक पाईप, खराब झालेली टायर्स अशा विविध वस्तुंपासून आकर्षक आणि उत्कृष्ट शिल्पांची निर्मिती केली. यामधून नागरिकांमध्ये थ्री आर अर्थात रिड्युस, रियुझ, रिसायकल या संदेशाचा प्रभावी प्रसार करण्यात आला आहे.
दरम्यान, नागरिकांनी आपल्या घरगुती कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी सेंटरचा वापर करावा. तसेच कचऱ्यातून उपयुक्त आणि सुंदर वस्तू तयार करण्याची वेस्ट टू आर्ट अशी सकारात्मक सवय अंगीकारावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी केले आहे.
या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छतेबरोबरच पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन महापालिका तर्फे करण्यात आले आहे. तसेच ‘टाकाऊ पासून टिकाऊ'चा संदेश देत ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान'चा महत्त्वपूर्ण संदेशही अधोरेखित झाला आहे.