नामकरणबाबत भूमिपुत्र आक्रमक
वाशी : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे अर्ध्वयू, लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव प्रलंबित असताना नवी मुंबई, पनवेल, उरण शहरात ‘नवी मुंबई विमानतळ' असे दिशादर्शक फलक लावल्याने येथील भूमिपुत्र आक्रमक झाले आहेत. २८ सप्टेंबर रोजी बेलापूर येथील ‘नवी मुंबई विमानतळ' फलक काढल्यानंतर ३० सप्टेंबर रोजी नेरुळ मध्ये लावण्यात आलेला ‘नवी मुंबई विमानतळ' फलक देखील उखडून टाकण्यात आला तर १ ऑवटोबर रोजी सीवूड्स मधील फलकावर दि.बा पाटील यांचे नाव चिकटवण्यात आले. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ फलकांचा वाद आता चिघळत चालला असल्याचे चित्र दिसत आहे.
येत्या ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरात प्रशासनाकडून नवी मुंबई विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर विमानतळाचे दिशानिर्देश फलक लावण्यात येत आहेत. मात्र, इतकी वर्षे आग्रही मागणी करुनही अद्याप नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव न मिळाल्याने आगरी-कोळी समाजाकडून आक्रमक पवित्रा घ्ोण्यात आला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दिशानिर्देश फलकांवर दि. बा. पाटील यांचे नाव न देता केवळ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असे लिहिल्याने आगरी-कोळी समाजाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून, भूमिपुत्रांकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे फलक काढण्यात येत आहेत. २८ सप्टेंबर रोजी बेलापूर उड्डाणपुलावरील प्रथम नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ फलक काढल्यानंतर नेरुळ पामबीच मार्गावरील फलक ३० सप्टेंबर रोजी स्थानिक भूमिपुत्रांनी काढून टाकले. तर १ ऑवटोबर रोजी देखील नेरुळ सीवूड्स सेक्टर-४८ येथील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दिशादर्शक फलकावर दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव चिकटवण्यात आले.त्यामुळे विमानतळ नामकरण फलकांचा वाद आता चिघळत चालला आहे.
एकीकडे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नावाबाबत केंद्र सरकारकडून गुप्तता पाळली जात असताना दुसरीकडे उद्घाटनाचा घाट घालत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दिशादर्शक फलक लावले जात आहेत. त्यामुळे ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही तोवर विमान उडणार नाही', अशी ठाम भूमिका भूमिपुत्रांची असून, दि. बा. पाटील यांच्या नावाशिवायचे फलक देखिल शहरात लावू देणार नाही, अशी ठाम भूमिका भूमिपुत्रांची असल्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ फलकांचा वाद आता चिघळत चालला आहे.