प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
दहावी-बारावी परीक्षार्थींसाठी विशेष रायडर असिस्टन्स
ठाणे : दहावी (इयत्ता १०वी) आणि बारावी (इयत्ता १२वी) बोर्ड परीक्षा १० फेब्रुवारी पासून सुरु होणार असल्याने विद्यार्थी वेळेवर त्यांच्या परीक्षा केंद्रांवर पोहोचू शकतील यासाठी ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी विशेष सहाय्य उपक्रम सुरू केला आहे. सदर उपक्रम पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि सह-आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आला आहे.
परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता जसे की, वाहतूक कोंडी, वाहनांमध्ये बिघाड किंवा अनपेक्षित विलंब याअनुषंगाने वाहतूक विभागाने शहरात ५४ खास नियुक्त केलेले रायडर्स तैनात केले आहेत. परीक्षा केंद्रांवर जाताना अडचणी येणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सदर रायडर्स स्टँडबायवर असतील. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरु होतील, तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (एचएससी) परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरु होतील. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत परिमंडळ-१ ते ५ मध्ये एकूण २२३ एसएससी परीक्षा केंद्रे आणि १२६ एचएससी केंद्रे आहेत.
मदत सहज उपलब्ध व्हावी यासाठी, वाहतूक पोलिसांनी अनेक हेल्पलाईन चॅनेल सक्रिय केले आहेत. विद्यार्थी किंवा पालक वाहतूक नियंत्रण हेल्पलाईन क्रमांक ८२८६३००३०० आणि ८२८६४००४०० वर संपर्क साधू शकतात. याव्यतिरिक्त, वाहतूक नियंत्रण व्हॉटस्ॲप क्रमांक ७०३९००३८६६ द्वारे मदत मागता येते. शहरातील सर्व १८ वाहतूक युनिटस्मध्ये हेल्पलाईन क्रमांक देखील उपलब्ध आहेत. आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देण्यासाठी नियंत्रण कक्षात ३ अतिरिक्त वाहने तैनात राहतील.
रस्त्यांशी संबंधित कोणत्याही समस्येची माहिती मिळताच वाहतूक कर्मचारी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचतील, अडथळे दूर करतील, वाहतूक नियंत्रित करतील आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा केंद्रांवर वेळेवर सुरक्षितपणे पोहोचण्यास मदत करतील. सदर विशेष सेवा केवळ परीक्षेच्या कालावधीसाठीच कार्यरत राहील. वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी पालक, विद्यार्थी आणि नागरिकांनी वाहतूक विभागाला सहकार्य करावे आणि विद्यार्थ्यांसाठी परीक्षा कालावधी सुरळीत आणि तणावमुक्त पार पडावा यासाठी या उपक्रमाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले आहे.