‘केडीएमसी'तील ३ रुग्णालये आता अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबरनाथ यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (करण्यात आला आहे. या करारानुसार ‘केडीएमसी'च्या अखत्यारीत येणारी ३ रुग्णालये आता वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी आणि उत्तम रुग्णसेवेसाठी अंबरनाथ शासकीय महाविद्यालयाला जोडली जाणार आहेत.

संलग्न होणारी रुग्णालयेः कल्याण पश्चिमेतील बाई रुक्मिणीबाई रुग्णालय, गौरीपाडा रुग्णालय आणि कल्याण पूर्वेतील शक्तीधाम रुग्णालय या ३ रुग्णालयांचा यात समावेश आहे.

सदरचा करार तात्पुरत्या स्वरुपात किमान ७ वर्षांसाठी किंवा शासकीय महाविद्यालयाची स्वतःची इमारत उभी राहीपर्यंत (जे आधी घडेल तोपर्यंत) असेल.

सर्वप्रथम बाई रुक्मिणीबाई रुग्णालय संलग्न केले जाईल, जिथे सर्व तज्ञ बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी) आणि त्यानंतर अतिदक्षता विभाग (आयसीयू) सुरु होईल. कर्मचारी उपलब्ध झाल्यावर गौरीपाडा रुग्णालयाची इमारत ताब्यात घेऊन तिथे सेवा विस्तारली जाईल. शेवटी,आरक्षणाचे बदल पूर्ण झाल्यावर शक्तीधाम रुग्णालय (कल्याण पूर्व) ताब्यात घेऊन इतर विभाग कार्यान्वित केले जातील.

अंबरनाथ येथे १०० विद्यार्थी क्षमता असलेले नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ४३० खाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास शासनाने जुलै २०२३ मध्ये मान्यता दिली होती. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रुग्णालयीन अनुभव मिळावा, यासाठी सदरचा निर्णय घेण्यात आला आहे.

२० एप्रिल रोजी झालेल्या सदर स्वाक्षरी सोहळ्याला महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले, आयुक्त अभिनव गोयल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, या करारामुळे कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांना तज्ञ डॉक्टरांकडून अधिक दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होणार असून वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी मोठी सोय होणार आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

केमिकलयुक्त पाण्यामुळे वालधुनी नदीत प्रदुषण