बिबट्याच्या हल्ल्यातील जखमींची ना. गणेश नाईक यांच्याकडून विचारपूस

भाईंदर : भाईंदर पूर्वेकडील नागरी वस्तीत शिरलेल्या बिबट्याच्या हल्ल्यातील जखमींची राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी भाईंदर येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांची विचारपूस करुन त्यांना दिलासा देत उपचाराचा सर्व खर्च सरकार करणार असल्याचे ना. गणेश नाईक यांनी सांगितले. तसेच त्यांनी प्रत्येक जखमीला प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

  १९ डिसेंबर रोजी पहाटे भाईंदर पूर्वेकडील पारिजात इमारतीत बिबट्या घुसला होता. इमारतीच्या पलॅटमधील टाक कुटुंबियांच्या घरात घुसून परिवारातील ३ सदस्यांना जखमी केले होते. यावेळी आरडाओरड ऐकून जमा झालेल्या शेजारील लोकांवर सुध्दा बिबट्याने हल्ला केला होता. बिबट्याच्या हल्ल्यात अंजली टाक, खुशी टाक, भारती टाक, प्रकाश यादव, श्याम सहानी, दिपू भौमिक, छगनलाल बागरेचा असे ७  जण जखमी झाले आहेत. त्यांना भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील अंजली मुकेश टाक (२३) हिची प्रकृती गंभीर झाल्यामुळे तिला मुंबईतील केईएम रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात आले.

२० डिसेंबर रोजी सकाळी वनमंत्री गणेश नाईक यांनी आमदार नरेंद्र मेहता आणि माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांच्या समवेत भाईंदरच्या पारिजात इमारतीला भेट दिली. त्यानंतर ते जखमींची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात गेले. त्यांनी सर्वांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगितले. तसेच सर्व वैद्यकीय खर्च सरकार करणार असून प्रत्येक जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली. याशिवाय ज्या कुटुंबातील कुटुंब प्रमुख जखमी झाला असल्यास त्याच्या कुटुंबातील सदस्याला कामधंदा करण्यासाठीसुध्दा मदत केली जाईल, असे ना. नाईक यांनी सांगितले. मुंबईच्या केईएम रुग्णालयात दाखल असलेल्या अंजलीवर प्लास्टिक सर्जरी करण्याची गरज असल्याने तो संपूर्ण वैद्यकीय खर्च शासन करेल, असे टाक कुटुंबियांना ना. गणेश नाईक यांनी आश्वासित केले आहे.

दरम्यान, बिबट्या नागरी वस्तीत कसा पोहोचला याचा तपास करुन यापुढे अशा घटना घडू नयेत म्हणून योग्य त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

इंडियन ऑईल टॅकिंग कंपनीकडे ५४७ कोटींची थकबाकी