भाईंदरमध्ये इमारतीत बिबट्या शिरला

भाईंदर : भाईंदर पूर्वेकडील अत्यंत गजबजलेली नागरी वस्ती असलेल्या बीपी रोडवरील तलाव क्रॉस रोड येथील पारिजात इमारतीतील पहिल्या मजल्यावरील घरात बिबट्याने शिरुन केलेल्या हल्ल्यात ४ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना १९ डिसेंबर रोजी घडली आहे. वन विभाग आणि अग्निशमन दलाच्या जवानांना ८  तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले.

भाईंदर पूर्वेकडील बीपी रोडवरील तलाव क्रॉस रोड येथील पारिजात इमारतीत १९ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बिबट्या शिरला आणि त्याने हॉलमध्ये झोपलेल्या ३ जणांवर हल्ला केला. नागरिकांची आरडा-ओरड ऐकून बेडरुममध्ये झोपलेली तरुणी बाहेर येताच बिबट्याने तिच्यावर सुध्दा हल्ला केला. तरुणी घाबरुन बेडरुममध्ये पळाली असता बिबट्या तेथे शिरला. झटापटीत तरुणी बाहेर आली आणि तिने बेडरुमचा दरवाजा बंद करुन घेतला.

सदरची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि बघ्यांची एकच गर्दी उसळली. दरम्यान, महापालिका अग्निशमन दलाचे जवान आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन विभागाचे अधिकारी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य आणि बिबट्याला बेशुध्द करण्यासाठी लागणारी गन मशीन घेऊन पोहोचले. यानंतर बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू केले. बिबट्याने जखमी केलेल्या ३ पुरुष आणि एका महिलेला नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. नागरी वस्तीत झालेल्या बिबट्याच्या या हल्ल्याने शहरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. अखेर वन विभाग आणि अग्निशमन दलाच्या जवानांना ८ तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे.

बिबट्या शहरात पुन्हा घुसू नये यासाठी कडक प्रतिबंधात्मक उपाय राबवावेत. जखमींवर शासनामार्फत तात्काळ योग्य उपचार करून आवश्यक ती भरपाई द्यावी, अशी मागणी ‘भाजपा'चे आमदार नरेंद्र मेहता यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

निवडणूक विषयक कामकाजाचा नमुंमपा आयुक्तांकडून आढावा