प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
नेरुळमध्ये धावत्या कारमधून जीवघेणी स्टंटबाजी; 4 तरुणांवर गुन्हा दाखल
सार्वजनिक सुरक्षेला धाब्यावर बसवणे पडले महागात
नवी मुंबई : नेरुळ परिसरातील रस्त्यावर धावत्या कारमधून शरीर काढून जीवघेणी स्टंटबाजी करणाऱ्या ४ तरुणांना नेरुळ पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. या स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेरुळ पोलिसांनी याची गंभीर दखल घेत चारही तरुणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार १८ मार्च रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास नेरुळ रेल्वे स्थानकासमोरील मुख्य रस्त्यावर एमएच-४३-सीएम-५१५३ या क्रमांकाच्या कारमधून काही तरुण जात होते. यावेळी कारमधील तरुणांनी कारच्या दरवाजातून शरीराचा अर्धा भाग बाहेर काढून धोकादायक पध्दतीने स्टंटबाजी केली. भरधाव वेगात असलेल्या कारमध्ये अशा प्रकारे कृत्य करुन त्यांनी केवळ स्वतःचाच नाही, तर रस्त्यावरील इतर प्रवाशांचाही जीव धोक्यात घातला होता.
या तरुणांच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ जागरुक नागरिकाने चित्रीत करुन सोशल मीडियावर प्रसारित केला होता. सदर व्हिडिओ व्हायरल होताच नेरुळ पोलिसांनी तत्काळ हालचाली करत कारचा क्रमांक आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे माहिती काढली. तपासात सदर कार नेरुळमध्ये राहणारे कौसार अली मुल्ला यांची असल्याचे तसेच ते गावी गेलेले असताना, त्यांचा मुलगा नवाज मुल्ला याने कार चालवण्यासाठी घेतल्याचे आढळून आले. त्यावेळी नवाज याने त्याचे मित्र आर्यन पाटील, अथर्व गायकवाड, कौस्तुभ राठोड या तीन मित्रांसह धावत्या कारमध्ये स्टंटबाजी केल्याचे उघडकीस आले.
त्यानंतर नेरुळ पोलिसांनी या चारही तरुणांवर बेदरकारपणे वाहन चालवणे आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी ठपका ठेवून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच सदर तरुणापैकी एका तरुणाला ताब्यात घेऊन त्यांना नोटीस बजावली आहे. रस्त्यावर स्टंटबाजी करुन दहशत निर्माण करणाऱ्याची गय केली जाणार नाही. पालकांनीही आपल्या पाल्यांकडे लक्ष द्यावे, जेणेकरुन अशा जीवघेण्या प्रकारांना आळा बसेल, असे नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांनी सूचित केले आहे.