म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
उरणकर जनतेवर ओढवणार पाण्याचे संकट
उरण : वाढत्या उरण तालुक्यातील पाण्याचे स्त्रोत खूप कमी आहेत. यात ‘एमआयडीसी'चे मध्यम आकाराचे रानसई धरण आणि जलसंपदा विभागाचे पुनाडे धरण असे दोनच पाण्याच मुख्य स्त्रोत आहेत. उरण मध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण आणि नागरीकरण सुरु आहे. त्यामुळे सद्यस्थितीत दररोज ५० ते ६० एमएलडी पाण्याची गरज भासते. मात्र, रानसई धरण आणि पुनाडे धरणाची क्षमता तेवढी नाही.त्यामुळे हीच परिस्थिती राहिलेली तर उरणकरांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. यासाठी उरण तालुक्यातील जनतेला पाणी पुरवठा करणाऱ्या रानसई आणि पुनाडे धरणांची क्षमता वाढविण्याची गरज आहे.
रानसई धरणाची पाणीसाठा साठवण्याची क्षमता १० एमसीएम, तर पुनाडे धरणाची क्षमता जेमतेम १.७५ एमसीएम एवढी आहे. या दोन धरणांच्या पाणी साठ्यावर अवलंबून राहिल्यास तालुक्याला फक्त ३ ते ४ महिनेच पाणीपुरवठा होऊ शकतो. त्यामुळे तालुक्यातील पाण्याची गरज भागविण्यासाठी ‘सिडको'चे हेटवणे धरण आणि ‘जीवन प्राधिकरण'च्या बारवी धरणातील पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. उरण तालुक्यात ओएनजीसी, जेएनपीटी, बीपीसीएल यासारखे मोठ-मोठे प्रकल्प आणि ‘जेएनपीटी'च्या अनुषंगाने निर्माण झालेले मोठ-मोठी गोदामे यामुळे या परिसरात नोकऱ्या आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत. या विकासामुळे उरण तालुक्यात नागरीकरण देखील झपाट्याने वाढत आहे.
या वाढत्या नागरीकरण आणि औद्योगिकीकरणासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी मात्र तालुक्यातील नागरिकांना दुसऱ्या तालुक्यांवर अवलंबून राहावे लागत आहेत. त्यामुळे उरण तालुक्यातील नागरिकांवर नवीन पाण्याचे स्त्रोत शोधण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यातच तालुक्यात झपाट्याने नागरीकरण वाढत आहे. मागील वर्षीपासून उरण तालुक्यात रेल्वे लोकल देखील सुरु झाली आहे. ‘न्हावा-शिवडी अटल सेतू'मुळे मुंबई थेट उरण तालुक्याशी जोडली गेली आहे. त्यामुळे येथील नागरी वस्तीत वाढ झाली आहे.
उरण मधील दोन धरणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, वाढत्या लोकसंख्येमुळे तो कमी पडत आहे. त्यामुळे स्थानिकांना अतिरिक्त पाण्याची गरज भासत असून पेण तालुक्यातील हेटवणे धरणावर अवलंबून रहावे लागत आहे. यासाठी ‘उरण'चे आमदार महेश बालदी यांनी आज २८ फेब्रुवारी रोजी जवळपास ७ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर होऊ घातलेल्या आमसभेत उरणकरांवर ओढवणाऱ्या पाणीटंचाई संदर्भात ठोस उपाययोजना करण्यासाठी जातीने लक्ष देणे गरजेचे आहे, अशी कळकळीची विनंती उरणकर नागरिकांनी केली आहे.