उरण बाजारात वाल शेंगांना वाढती मागणी
उरण : सध्या थंडीतील दवावर पिकवण्यात आलेल्या सेंद्रिय वालाच्या शेंगांचा हंगाम सुरु झाला आहे, तब्बल चार महिन्याच्या प्रतीक्षेनंतर वाल शेंगा पीक आले आहे. उरण तालुक्यातील चिरनेर, कळंबुसरे, कोप्रोली, नागाव, केगाव, साई, दिघाटी, केळवणे, खारपाडा या परिसरात वाल शेंगांचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
उरण बाजारपेठेत ठिक-ठिकाणी वालाच्या शेंगा विक्री करिता आणण्यात येत आहेत. पोपटी बनविण्यासाठी वालाच्या शेंगा लागत असल्याने वालाच्या शेंगाना डिमांड वाढली आहे.
भात पीक आल्यानंतर त्याच शेत जमिनीवर वाल बियाणे टाकण्यात येते. मात्र, त्यासाठी पाणी न घालता या काळात येणाऱ्या थंडीतील दवाच्या पाण्यावर वाल शेंगा पीक घेतले जाते. थंडीतील दवाच्या पाण्यावर पिकविण्यात येत असल्याने वाल शेंगा चविष्ट असतात. सध्या वालाच्या शेंगा बाजारात येऊ लागल्याने, ग्राहक वालाच्या शेंगा घेण्यास आतुर झाले आहेत. वाल शेंगा आणि चवळी शेंगांसाठी थंडीचा हंगाम खूप उपयुक्त आहे. थंडीत पडणाऱ्या दवावर वाल शेंगा पीक तयार होते. जेवढी जास्त थंडी तेवढे वाल शेंगा पीक मोठ्या प्रमाणावर भरघोस येते.
थंडीतील दवावर पिकलेल्या वाल शेंगांचा दर्जा उत्तम असून, वाल शेंगा पिकाला भौगोलिक मानांकन देण्याची मागणी उरण तालुवयातील वाल शेंगा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. वाल शेंगा तयार होण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागतो. यावर्षी खूप थंडी आणि दव पडल्याने वाल, चवळी शेंगांच्या पिकांमध्ये भरघोस वाढ झालेली आहे. मात्र, या पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना खूप मेहनत घेऊन, शेताची राखण करावी लागते. वाल आणि चवळी शेंगा उत्पादनामुळे शेतकऱ्यांना नफा मिळत आहे. भात पिकानंतर वाल, चवळी, हरभरा, मूग तसेच अन्य कडधान्यांचे पीक घेतले जाते.
सध्या वाल शेंगांना प्रचंड प्रमाणावर मागणी असून, चवळी शेंगांचा प्रतिकिलो किलो दर १२० रुपये तर वाल शेंगांचा प्रतिकिलो दर १०० रुपये आहे, अशी माहिती अलिबाग तालुक्यातील कावाडे येथील शेंगा विक्रेत्या नंदिनी प्रशांत म्हात्रे यांनी दिली.
दरम्यान, पोपटी तयार करण्यासाठी वाल शेंगा लागतातच. त्यामुळे पोपटीप्रेमी दरवर्षी वालाच्या शेंगांची वाट पाहत असतात. वाल शेंगा खायला चाविस्ट असतात, असे उरण मधील सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटोळे यांनी सांगितले.