सुसज्ज पशुवैद्यकीय रुग्णालय उभारण्याची ‘प्रहार'तर्फे मागणी

भिवंडी : शहरात पाळीव आणि मोकाट प्राण्यांची संख्या झपाट्याने वाढत असून यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याने प्राण्यांसाठी भिवंडी-निजामपूरा शहर महापालिका कार्यक्षेत्रात सुसज्ज पशुवैद्यकीय रुग्णालय उभारण्यात यावा, अशी मागणी ‘प्रहार जनशक्ती पक्ष'चे भिवंडी अध्यक्ष भरत भोईर यांनी महापालिका आयुक्त अनमोल सागर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

त्यानुसार राज्य शासनाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना प्राण्यांच्या आरोग्य सेवेसंदर्भात आवश्यक ती पावले उचलण्याचे आदेश स्पष्ट आदेश आहेत. परंतु, याबाबत भिवंडी महापालिकाकडून कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे शहरात भटक्या श्वानांची संख्या वाढली असून श्वानांच्या निर्बीजीकरणाची सोय नसल्याने श्वान दंशाच्या घटनाही वाढल्या आहेत. तसेच नागरिकांना पाळीव प्राण्यांच्या उपचारासाठी, लसीकरणासाठी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महापालिका कार्यक्षेत्रात पशुवैद्यकीय रुग्णालय उभारुन त्यामध्ये अधिकारी, कर्मचारी आणि साधन सामग्री रुग्णालयात उपलब्ध करुन द्यावी. तसेच मोकाट प्राण्यांच्या आरोग्य सेवेसाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी. मुक्या प्राण्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी महापालिकेच्या संबंधित विभागासोबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन करावे. यासह महासभेत ठराव मंजूर करुन तात्काळ पशुवैद्यकीय रुग्णालय उभारण्यात यावे, अशा मागण्या भरत भोईर यांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नगरपालिकेत रस्ते कामांच्या बिलात अनियमितता