एपीएमसी मसाला मार्केट आवारात खड्ड्यांचे साम्राज्य?
वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मसाला बाजारात डांबरी रस्त्यांची पावसात पुरती दैना उडाली असून, मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांतून वाट काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे एपीएमसी मसाला बाजारातील रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्याची मागणी एपीएमसी मसाला बाजारातील व्यापारी, वाहन चालक आणि ग्राहकांकडून होत आहे.
वाशी मधील एपीएमसी बाजार समिती आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. याच बाजारपेठेतून मुंबई आणि उपनगरात अन्नसाखळीचा पुरवठा केला जातो.त्यामुळे एपीएमसी बाजार आवारात रोज हजारो वाहनांची ये-जा होते. शेतमाल घेऊन येणाऱ्या अवजड वाहनांमुळे एपीएमसी बाजार आवारातील डांबरी रस्त्यांवर दरवर्षी खड्डे पडत असतात. रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी व्यापारी वर्गाकडून एपीएमसी प्रशासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा करण्यात येत आहे.
बाजार समिती प्रशासनाकडून एपीएमसी बाजार आवारातील डांबरी रस्त्यांवर पडणारे खड्डे भरून तात्पुरती मलमपट्टी केली जाते. मात्र, पावसाचा जोर वाढताच एपीएमसी बाजार आवारातील डांबरी रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडतात. परिणामी खड्ड्यांचे अडथळे पार करताना वाहन चालकांची दमछाक होत असून, वाहनांचे नुकसान होत आह. त्यामुळे एपीएमसी बाजार आवारातील डांबरी रस्त्यांवर पडलेले खड्डे तात्काळ भरावे, अशी मागणी एपीएमसी बाजार आवारातील व्यापारी, येणारे ग्राहक आणि वाहन चालक करीत आहेत.
एपीएमसी मसाला बाजार आवारातील रस्त्यांवर पावसामुळे पडलेले खड्डे भरण्याचे काम सध्या सुरु असून, पुढील दोन-तीन दिवसांत रस्त्यांवरील सर्व खड्डे भरले जाणार आहेत. - सतीश देशमुख, उप अभियंता - मसाला बाजार, मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी), वाशी.