प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
हाय-टेक' नवी मुंबई पोलीस: ८० टक्के गुन्ह्यांची उकल
नवी मुंबई : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत नवी मुंबई पोलीस दलाने 2025 या वर्षात गुन्हेगारीवर प्रभावी अंकुश मिळवला आहे. गुरुवारी आयोजित वार्षिक पत्रकार परिषदेत सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, नवी मुंबई पोलिसांनी गुन्हे उकल करण्याच्या प्रमाणात लक्षणीय सुधारणा करत 80 टक्क्यांचा टफ्पा गाठला आहे. त्याचप्रमाणे महिलांची सुरक्षा, नशामुक्त शहर आणि सायबर गुन्हेगारी रोखणे या त्रिसूत्रीवर पोलिसांनी दिलेला भर यशस्वी ठरल्याचे या अहवालावरुन दिसून येत आहे.
या वार्षिक पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त सचिन गुंजाळ, पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) संजयकुमार पाटील, परिमंडळ-2चे उपायुक्त अमित काळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी सादर केलेल्या वार्षिक अहवालात 2025 या वर्षभरात दाखल झालेल्या एकूण गुह्यांपैकी 80 टक्के गुह्यांचा पोलिसांनी छडा लावला आहे. विशेष म्हणजे शरीराविरुद्धच्या गंभीर गुह्यांमध्ये तपासाचे हे प्रमाण 99 टक्क्यांवर पोहोचले आहे. मालमत्तेविषयक गुह्यांच्या तपासातही मागील वर्षाच्या तुलनेत 5 टक्क्यांनी वाढ होऊन तो 57 टक्क्यांवर गेला आहे. पोलिसांनी चोरीला गेलेला 18.30 कोटींचा मुद्देमाल हस्तगत करून मूळ मालकांना परत केला आहे.
नशामुक्त नवी मुंबई अभियानांतर्गत पोलिसांनी 2025 या वर्षभरात 215 किलो अमली पदार्थ जप्त केले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत तब्बल 63 कोटी रुपये इतकी आहे. ड्रग्जची विक्री करणाऱया मुख्य साखळीवर (सफ्लाय चैन) हल्ला चढवत पोलिसांनी 10 कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज नष्ट केले आहेत. त्याचप्रमाणे सायबर गुन्हेगारीचे मोठे आव्हान पेलताना नवी मुंबई पोलिसांनी गोल्डन अवरमध्ये तातडीने मिळालेल्या तक्रारींमुळे नागरिकांचे सुमारे 10 कोटी रुपये बँक खात्यात गोठवले आहेत. 1930 या हेल्पलाइनचा प्रभावी वापर केल्याने शेकडो नागरिकांची आर्थिक फसवणूक टळली आहे.
शहराच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत 1000 हून अधिक बेकायदेशीररीत्या राहणाऱया परदेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांना मायदेशी पाठवण्याची (डिपोर्टेशन) प्रक्रिया पुर्ण केली आहे. यात 300 नायजेरियन आणि 618 बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी कारवाई, अवैध धंद्यांवर नियंत्रण, वाहतूक शिस्तीचे पालन, तसेच नागरिकांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबविण्यात नवी मुंबई पोलीसांनी प्रभावी कामगिरी केली आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, डॅशबोर्ड प्रणाली, सीसीटीव्ही नेटवर्क, फॉरेन्सिक व्हॅन, हेल्पलाईन व अन्य डिजिटल उपक्रमांमुळे पोलीस सेवांची कार्यक्षमता वाढल्याचेही नमूद करण्यात आले. नवी मुंबई शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध असून भविष्यातही तंत्रज्ञानाधिष्ठित, नागरिकाभिमुख आणि पारदर्शक पोलिसिंगवर भर देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मिलिंद भारंबे (पोलीस आयुक्त नवी मुंबई)
नवी मुंबई पोलीस दलासाठी 2025 हे वर्ष आव्हानात्मक असले तरी आम्ही अनेक आघाडÎांवर यश मिळवले आहे. 80 टक्के गुन्हे उकल करणे आणि महिलांवरील अत्याचाराच्या गुह्यात 99 टक्के कामगिरी करणे, हे आमच्या टीमच्या कठोर परिश्रमाचे फळ आहे. महिलांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि ती यापुढेही राहील. सायबर गुन्ह्यात आम्ही गोल्डन अवरवर लक्ष केंद्रित करुन कोटयवधी रुपये वाचवले आहेत. नवी मुंबईला नशामुक्त करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नागरिकांनीही सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करावे.