म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
होळी सणासाठी तयार तांदूळ पापड्यांवर भिस्त?
वाशी : कोकणवासियांचा अत्यंत आवडता ‘होळी' सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. होळी पूजनाला पंच नैवद्य दाखवूनच पूजन केले जाते. या नैवेद्यात तांदळाची पापडी नसेल तर तो नैवेद्य अपूर्णच समजला जातो. त्यामुळे तांदळाच्या पापड्या बनवण्यासाठी नवी मुंबई शहरातील गावागावात होळी सणाआधी दहा ते बारा दिवस आधीच लगबग पहावयास मिळत होती. मात्र, वाढत्या शहरीकरणामुळे नवी मुंबईतील चुलींची जागा गॅसने घेतल्याने बहुतांश गृहिणी तांदळाच्या तयार पापड्या विकत घेण्यावर भर देत आहेत.
हिंदी धर्मात होळी सणाला अनन्यसाधारण महत्व आहे. कोकण किनारपट्टीत होळी सण शिमगा म्हणून साजरा केला जातो. या सणासाठी दहा ते बारा दिवस आधीच तयारी सुरु होते.नवी मुंबई सारख्या आधुनिक शहरात येथील भूमिपुत्रांनी आपल्या सणांची परंपरा आजही कायम टिकवून ठेवली आहे. विशेष म्हणजे तरुण पिढी जुन्या चालीरीती जोपासत आहेत. त्यात नवीन वर्षातील हौसेचा पहिला मोठा सण म्हणजे होळी. आगरी-कोळी समाजात होळी सण दिवाळी सणासारखा साजरा करण्याची परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. होळी सणासाठी नानाविध नैवद्य बनवण्याची परंपरा आहे. त्यातीलच एक होळीला लागणारा नैवेद्य म्हणजे वाफेवर बनवली जाणारी तांदळाची पापडी अर्थात कुणी यास फेणी देखील म्हणतात. सध्या शहरीकरणामुळे तांदळाच्या पापड्या या वेळेनुसार आणि सवडीनुसार बनवल्या जातात. मात्र, पूर्वी होळी सणाच्या पंधरा दिवस आधीपासूनच घरोघरी चुलीवर वाफेवर तांदळाच्या पापड्या बनविण्याची लगबग पाहायला मिळत होती. आता मात्र तांदळाच्या पापड्या बनविण्याची लगबग जरी पाहायला मिळत नसली तरी घरोघरी किमान काही तरी किंवा नैवेद्यला लागतील एवढ्या तरी पापड्या बनवल्या जातात. आता नवी मुंबई शहरात चुलीची जागा गॅसने घेतल्याने तांदळाची पापडी बनवण्याची कला लोप पावत चालली आहे. त्यामुळे काही लोकांना आज तयार तांदळाच्या पापडीवर विसंबून राहावे लागत आहे.
------------------------------
होळी सणात तांदळाच्या पापड्यांना नैवेद्य दाखविण्यासाठी अधिक मान असतो. तांदळाच्या पापडी शिवाय नैवैद्य अपूर्णच वाटतो. त्यामुळे आपल्या सणांना जो काही नैवद्य लागतो तो जर कुणाला येत नसेल तर आपल्या समाजातील ज्येष्ठ महिलांकडून निसंकोच नैवध शिकून घेतले जातात. तांदळाची वाफेवर बनवली जाणारी पापडी खर्चिक नसली तरी तांदळाची पापडी वाफेवर बनवण्यासाठी वेळ आणि कष्ट अधिक लागतात.त्यामुळे नवी मुंबई शेजारील उरण तालुक्यातील गावागावातून तांदळाच्या पापड्या विक्रीसाठी येत असून, प्रति नग ३ ते ५ रुपये दराने पापडी विक्री होत आहे.
--------------------------
काही वर्षांपूर्वी होळी सणाच्या तोंडावर घराघरात महिलांची पापड्या बनविण्यासाठी लगबग सुरु असत होती. त्यावेळी पापड्या या जवळच्या नातेवाईकांसाठी देखील बनवल्या जात असत. आगरी-कोळी समाजातील लग्नात देखील पापड्यांना अधिक मान असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पापड्या बनवल्या जात असत. कोणी रंगीबेरंगी पापड्या बनवतात तर कोणी पापडीवर होळी मातेचे नाव देखील टाकतात. वाफेवर बनवलेली तांदळाची पापडी हवा बंद डब्यात ठेवल्यास ती वर्ष-दीड वर्ष खराब होत नाही.
--------------------------------------
१५-२० वर्षांपूर्वी तांदळाच्या पापड्या बनविण्याची पाहायला मिळणारी लगबग आता मात्र पाहायला मिळत नाही. आता उरण तालुक्यातील गावागावातून दारावर तयार पापड्या विक्रीसाठी येत असल्याने गृहिणी तयार तांदळाच्या पापड्या विकत घेण्यावर भर देतात. मात्र, आपल्या सणांमधील संस्कृतीचा एक भाग असल्याने तांदळाच्या पापड्या बनविण्याची पध्दत आजच्या गृहिणींनी आपल्या आई, सासूकडून शिकून घेण्याची गरज आहे. - मनीषा भोईर, गृहिणी - नवी मुंबई.