तलावांचे संवर्धन-जतन सर्वांची जबाबदारी -नूतन बांदेकर
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील तलाव आपल्या गौरवाचा विषय असून त्याचे संवर्धन-जतन आजच्या आणि पुढच्या पिढ्यांसाठी करण्याची जबाबदारी आपल्याच खांद्यावर आहे. त्यामुळे डोळसपणे या तलावांकडे पाहूया आणि तलाव जपूया, असे प्रतिपादन ‘मुक्काम पोस्ट तलाव' या पुस्तकाच्या लेखिका आणि ठाणे महापालिकेच्या शाळेतील प्रभारी मुख्याध्यापिका नूतन बांदेकर यांनी केले.
जागतिक वन दिन (२१मार्च), जागतिक जल दिन (२२ मार्च) आणि जागतिक हवामान दिन (२३ मार्च) यांच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका तर्फे विचारमंथन व्याख्यानमालामध्ये ‘तलावांचे ठाणे' या विषयावर व्याखानाचे आयोजन करण्यात आले. ‘व्याख्यानमाला'चे सदर १५वे पुष्प महापालिका मुख्यालय येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे संपन्न झाले.
तलावांचे प्रकार, निरोगी आणि आजारी तलावांची लक्षणे, तलावांचे जैवसाखळीतील महत्त्व याचे विवेचन नूतन बांदेकर यांनी केले. शिलाहार काळापासून ठाणे आणि परिसरातील ६० हून अधिक तलावांची नोंद इतिहासात आहेत. त्यापैकी ४२ तलाव सध्या अस्तित्वात आहेत, असल्याचेही बांदेकर यानी सांगितले.
या प्रत्येक तलावाला, सभोवतालच्या परिसराला भेट देऊन तलावांची माहिती घेतली. त्याच्या इतिहासाचा अभ्यास केला. त्यातून तलावांचे महत्त्व अधोरेखित झाले. सर्वांनी या तलावांची काळजी घेतली पाहिजे. तलावांच्या स्थितीबाबत जागरुक राहिले पाहिजे. तलावात कचरा, मासे आणि पक्ष्यांना खाणे टाकले जाणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे असेही बांदेकर यांनी स्पष्ट केले.
मासुंदा तलावापासून वागळे इस्टेटमधील सीपी टँकपर्यंत सर्व तलावांचे सचित्र सादरीकरण बांदेकर यांनी या व्याख्यानात केले. ठाणे महापालिका आणि पर्यावरण दक्षता मंच यांच्या समन्वयाने सुरु असलेल्या ‘माझा तलाव' या मोहिमेची माहितीही बांदेकर यांनी दिली. या मोहिमेत तलावांना भेटी, तलावांबाबत जागरूकता आदी उपक्रम हाती घेण्यात येतात. त्यात विद्यार्थ्यांपासून सर्वच ठाणेकर मोठ्या उत्साहाने सहभागी होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
व्याख्यानापूर्वी, उपायुक्त (माहिती-जनसंपर्क) उमेश बिरारी, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांच्या हस्ते नूतन बांदेकर यांचा शाल, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या व्याख्यानाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटणकर यांनी केले.