महिलांना लुटणारी टोळी जेरबंद

नवी मुंबई : रस्त्याने एकट्या जाणाऱ्या महिलांना गाठून त्यांना शस्त्राचा धाक दाखवत त्यांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या एका सराईत टोळीचा रबाळे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अवघ्या १० दिवसांमध्ये तांत्रिक तपास आणि तब्बल १३० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासून पोलिसांनी ३ आरोपींसह चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सराफाला अटक केली आहे. या कारवाईमुळे रबाळे पोलिसांच्या हद्दीत घडलेल्या तीन गुन्ह्यांची उकल झाली आहे. या आरोपींकडून आणखी काही जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता ‘रबाळे पोलीस ठाणे'चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी व्यक्त केली आहे.  

चैन स्नॅचींग करणाऱ्या या लुटारुंच्या टोळीने गत २४ मार्च २०२६ रोजी पहाटे ५ ते ७ वाजताच्या दरम्यान ऐरोली आणि तळवली परिसरात धुमाकूळ घातला होता. या लुटारुंनी ऐरोली सेक्टर-१ मध्ये ५३ वर्षीय निर्मला पवार यांना चाकूचा धाक दाखवून जखमी करत त्यांच्याकडील ७२ हजार ५०० रुपयांचा ऐवज आणिे तळवली गावात जेन्सीबाई नाडार या महिलेशी झटापट करुन त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्राचा भाग तोडून लुटला होता.याशिवाय ऐरोली गावात ७२ वर्षीय यमुना भोईर या वृध्देच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाची सोन्याची जिरामाळ हिसकावून नेली होती.  

या घटनेचे गांभीर्य ओळखून नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आणि सह पोलीस आयुक्त संजय येनपुरे,  अप्पर पोलीस आयुवत (गुन्हे) दिपक साकोरे यांनी तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार ‘रबाळे पोलीस ठाणे'चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास पथकाने घणसोली पासून कोपरखैरणे, वाशी, मानखुर्द, चेंबूर, गोवंडी आणि घाटकोपर पर्यंतच्या सुमारे १३० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. तपासात पिस्ता रंगाच्या सुझुकी ऍक्सेस स्कुटीचा माग काढत पोलिसांनी मुख्य आरोपी आयुष अर्जुन देटके (वय-२२) आणि त्याचे सहकारी अपर्णा संदीप आवळे (वय-३९), अर्जुन बाबु चव्हाण (वय-४१) या आरोपींना अटक केली. या आरोपींकडून चोरीचे सोने विकत घेणारा मानखुर्द येथील ज्वेलर्स चालक तखतसिंग प्रेमसिंग राठोड (वय-४७) याला देखील रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आता या टोळीत सहभागी असलेल्या अविनाश शिशुपाल, अनिकेत शिशुपाल आणि मोहम्मद इरफान या फरार आरोपींचा शोध सुरु केला आहे. अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी ९१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे तुकडे, सोन्याचे मणी, ५० हजार रुपये किमतीची स्कुटी आणि गुन्ह्यात वापरलेला काळ्या रंगाचा चाकू हस्तगत केला आहे.  

महिलांना लुटणारी टोळी जेरबंद करण्याची यशस्वी कामगिरी पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली ‘रबाळे पोलीस ठाणे'चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सचिन गवळी, पोलीस निरीक्षक (प्रशासन) शाम बनसोडे यांच्या सुचनांनुसार पोलीस उपनिरीक्षक राहुल गरड, पोलीस हवालदार प्रसाद वायंगणकर, भोसले, पोलीस नाईक करंकाळ, पोलीस शिपाई साळुंखे, राळे,  तडवी आदींच्या पथकाने केली.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

ठाणे येथील ‘डोमिनोज पिझ्झा'वर छापा