म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
केडीएमसी शाळांची सुरक्षा ‘सीसीटिव्ही'च्या निगराणीत
कल्याण : महाराष्ट्र शासन आणि कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांच्या निर्देशानुसार महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ‘केडीएमसी'च्या एकूण ६१ शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली असून याअंतर्गत ५०२ सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.
शासन निर्णयानुसार खाजगी, शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने कल्याण-डोंबिवली महापालिकेने तात्काळ सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करुन महापालिकेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम हाती घेतले होते. आता महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.
शाळेतील सीसीटीव्ही यंत्रणेची ठराविक अंतराने फुटेज तपासणी आणि काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास त्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी विशेषत्वाने मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीची असणार आहे. मुख्याध्यापकांनी आठवड्यातून किमान ३ वेळा फुटेज तपासणी करणे आवश्यक आहे. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज मध्ये काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास याबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहणार आहे.
दरम्यान, ‘केडीएमसी'च्या एकूण ६१ शाळांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्या सुरक्षिततेसाठी एकूण ५०२ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सर्व शाळांमध्ये मुख्याध्यापक यांच्या कक्षात सीसीटीव्ही मॉनिटर बसविण्यात आले असल्याची माहिती महापालिक विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.