‘एआय'मुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना बळ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि लोकाभिमुख करण्याच्या दिशेने राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कृत्रिम बुध्दिमत्ता (एआय) आधारित आधुनिक उपाययोजनांचा प्रभावी वापर करण्यासाठी राज्य शासन आणि वाधवानी एआय या सामाजिक हेतूने कार्य करणाऱ्या ना-नफा-ना-तोटा संस्थेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्य-कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतून करण्यात आलेल्या या सामंजस्य कराराअंतर्गत क्षयरोग (टीबी), मातृ, नवजात आणि बाल आरोग्य, प्राथमिक आरोग्य सेवा, ई-हेल्थ आदि क्षेत्रांमध्ये एआय तंत्रज्ञानाचा समावेश करुन आरोग्य सेवांचा दर्जा अधिक उंचावण्यात येणार आहे. राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार, वेळेवर आणि प्रभावी आरोग्य सेवा पोहोचवणे असा या भागीदारीचा मुख्य उद्देश आहे.

डिजिटल महाराष्ट्र आता पुढील टप्प्यात प्रवेश करत असून कृत्रिम बुध्दिमत्ता सार्वजनिक आरोग्यासाठी ‘फोर्स मल्टिप्लायर' ठरणार आहे. ‘वाधवानी एआय'च्या सहकार्याने एआय सक्षम आरोग्य व्यवस्था उभारणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

क्षयरोग, प्राथमिक आरोग्य सेवा आणि मातृ-बाल आरोग्यासाठी एआय साधनांचा वापर केल्यास लवकर निदान, सुलभ सेवा आणि अग्रिम कर्मचाऱ्यांना वेळेवर मार्गदर्शन मिळेल. सदर भागीदारी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम आणि सक्षम बनवेल, असे ना. प्रकाश आबिटकर म्हणाले.

‘वाधवानी एआय'चे प्रमुख शेखर शिव सुब्रमणियन यांनीही या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, महाराष्ट्र शासनाबरोबरची सदर भागीदारी नवोन्मेष, समता आणि दीर्घकालीन परिणाम साधणाऱ्या आरोग्य सुधारणांसाठी महत्त्वाची ठरेल.

या सामंजस्य करारामध्ये क्षयरोग निर्मुलन अंतर्गत ‘एआय'चा प्रभावी वापर करताना क्षयरोग रुग्णांमध्ये उपचार सोडून देण्याचा धोका, उपचारातील अडथळे आणि मृत्यूची शक्यता उपचाराच्या सुरुवातीलाच ओळखण्यासाठी एआय आधारित प्रणाली वापरण्यात येणार आहे. कफ अगेंस्ट टीबी या एआय आधारित ॲप्लिकेशनच्या माध्यमातून खोकल्याच्या आवाजाचे विश्लेषण करुन क्षयरोगाची प्राथमिक ओळख आरोग्य संस्थांमध्ये जलदगतीने करता येणार आहे.

याशिवाय, उपगाव पातळीवर (५०० मी. × ५०० मी.) क्षयरोगाचा धोका दर्शविणारे व्हल्नरेबिलिटी मॅपिंग तयार करण्यात येणार असून, लोकसंख्या घनता, आरोग्य सुविधा, प्रदूषण, कुपोषण यांसारख्या घटकांचा अभ्यास करून सक्रिय रुग्ण शोध मोहिमा अधिक परिणामकारक रितीने राबविता येणार आहेत. राज्याच्या ई-संजीवनी टेलिमेडिसीन सेवेमध्ये एआय आधारित विलनिकल डिसीजन सपोर्ट सिस्टीम (सीडीएसएस) समाविष्ट करण्यात येणार आहे. यामुळे डॉक्टरांना अचूक निदान आणि रुग्णांच्या तक्रारींचा संक्षिप्त आढावा घेणे सुलभ होणार आहे. मधुमेही रुग्णांसाठी मधुनेत्रा या एआय प्रणालीद्वारे डोळ्यांच्या तपासणीस मदत होणार असून आवश्यकतेनुसार तज्ञांकडे रुग्णांना संदर्भित करता येणार आहे.

‘हेल्थ वाणी' या एआय आधारित संवाद सहाय्यकाच्या माध्यमातून आशा, एएनएम यासारख्या अग्रिम आरोग्य कर्मचाऱ्यांना मोबाईलवरच प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि प्रमाणित माहिती सहज उपलब्ध होणार आहे. ‘शिशु मापन' या एआय आधारित ॲप्लिकेशनमुळे केवळ स्मार्टफोन आणि साध्या मोजमापाच्या साधनांच्या सहाय्याने नवजात शिशूचे वजन, लांबी, डोके व छातीचा घेर मोजणे शक्य होणार आहे. घरभेटीद्वारे ४२ दिवसांपर्यंत नवजात शिशूंची काळजी अधिक प्रभावीपणे घेता येणार आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पामबीच हिट-अँड रन