तब्बल २१ तासानंतर विद्युत पुरवठा सुरळीत

नवीन पनवेल : तब्बल २१ तासानंतर पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातील जवळपास ४० टक्केहुन अधिक गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. मध्यरात्री वीज गायब झाल्याने अनेकांना भयंकर त्रास सहन करावा लागला. विद्युत अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवर फोन केला असता त्यांचे फोन फॉरवर्ड केले असल्याचे वीज ग्राहकांनी सांगितले.

७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२ वाजता खंडीत झालेला विद्युत पुरवठा ८ ऑक्टोबर रोजी रात्री ९ च्या दरम्यान सुरळीत करण्यात आला. तब्बल २१ तास वीज नसल्याने अनेकांचे पाण्याविना हाल झाले. पाणी नसल्याने काहींची गैरसोय झाली, तर कित्येकांना पाण्याचे जार विकत घ्यावे लागले. मध्यरात्री वीज गायब झाल्याने अनेकांची झोपमोड झाली. त्यातच डासांनी देखील नागरिकांना हैराण केले. वीज नसल्याने अनेकांना लहान मुलांसोबत जागरण करावे लागले. काही वेळानंतर वीज येईल या भाबड्या आशेत नागरिक होते. अखेर हजारो वीज ग्राहकांनी तब्बल २१ तासानंतर वीज आल्याने सुटकेचा निःश्वास सोडला.

ऑक्टोबर हिट असल्याने रात्री आणि दिवसा प्रचंड उष्मा जाणवत होता. त्यातच शाळेतील विद्यार्थ्यांना देखील या विजेचा फटका बसला. फॅन नसल्याने वर्गात उष्णता जाणवत होती. ‘महावितरण'च्या भोंगळ कारभाराचा फटका अनेकांन्ंाा बसला आहे. मात्र, तब्बल २१ तासानंतर विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याने अनेक जण नाराज झाले. वीज कधी येईल यासाठी ‘महावितरण'च्या अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मोबाईल फोन फॉरवर्ड केले होते. त्यामुळे कोणाशी संपर्क साधायचा हेच समजत नव्हते.

आकुर्ली उपकेंद्रातील २२ केव्हाी एचटी केबलमध्ये फॉल्ट झाल्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला होता. लोड डायव्हर्ट करुन काही ठिकाणी वीजपुरवठा रात्रीच सुरु करण्यात आला होता. २.५ किमी लांब केबल असल्यामुळे फॉल्ट आइडेंटिफाय केल्यानंतर केबल जोडण्याचे काम सुरु होते.
-ममता पांडे, जनसंपर्क अधिकारी, महावितरण. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कंत्राटी सफाई कामगारांना कामावरुन काढले