खासगी शस्त्र परवानाधारकांनो, आता पोलिसांच्या हायटेक' रेंजमध्ये करा गोळीबाराचा सराव !

नवी मुंबई : स्वतःच्या संरक्षणासाठी रिव्हॉल्व्हर किंवा पिस्तुल बाळगणाऱ्या खासगी परवानाधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नवी मुंबई पोलिसांनी आपल्या कळंबोली येथील मुख्यालयात अत्याधुनिक आणि पूर्णपणे बंदिस्त अशी 'कंटेनर शुटिंग रेंज' प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे. विशेष म्हणजे, केवळ पोलीसच नव्हे, तर ज्यांच्याकडे कायदेशीर शस्त्रास्त्र परवाना आहे, अशा नागरिकांनाही आता या ठिकाणी सराव करण्याची संधी मिळणार आहे.

या अत्याधुनिक शुटिंग रेंजची निर्मिती ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील मॅग ५ इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीने केली आहे. ही कंपनी संरक्षण क्षेत्रातील अशा प्रकारच्या आधुनिक प्रशिक्षणाच्या सुविधा विकसित करण्यात तज्ज्ञ मानली जाते. ही शुटिंग रेंज एका मोठ्या कंटेनरमध्ये तयार करण्यात आली असून ती पूर्णपणे वातानुकूलित आणि ध्वनीरोधक आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनवण्यात आलेली ही देशातील अशा प्रकारची पहिलीच फुल्ली इक्विप्ड इंडोर रेंज मानली जात आहे.

शुटिंग रेंजची तांत्रिक वैशिष्ट्ये:

या फुल्ली कंटेनरराईज्ड शुटिंग रेंजची लांबी ३७ मीटर, रुंदी ४ मीटर आणि उंची ४ मीटर इतकी आहे.यामध्ये सराव करण्यासाठी एकूण ३ स्वतंत्र लेन्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ही प्रणाली २०२५ मध्ये तयार करण्यात आली असून ती पूर्णपणे आधुनिक मानकांनुसार आहे.यामध्ये प्रमाणित बुलेट-ट्रॅपिंग प्रणाली, ध्वनीरोधक उपचार आणि एकात्मिक देखरेख यंत्रणा बसवण्यात आली आहे. यात गोळी झाडल्यानंतर तिचे अवशेष सुरक्षितपणे जमा करण्याची यंत्रणा आहे. तसेच सरावाचे बारकाईने निरीक्षण करण्यासाठी सीसीटीव्ही आणि कंट्रोल पॅनेल ची देखील व्यवस्था आहे. बंदिस्त स्वरूपामुळे पाऊस, ऊन किंवा थंडीचा सरावावर कोणताही परिणाम होणार नाही. मर्यादित जागेत जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करून ही रेंज उभारण्यात आली आहे.

परवानाधारकांसाठी सुवर्णसंधी 

अनेकदा खासगी शस्त्र परवानाधारकांना सरावासाठी सुरक्षित जागा मिळत नाही. ही अडचण ओळखून पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या व्यक्तींकडे अधिकृत रिव्हॉल्व्हर परवाना आहे, त्यांना नियमांचे पालन करून या हायटेक रेंजमध्ये सराव करण्याची परवानगी दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे नागरिकांना तज्ज्ञांच्या देखरेखीखाली सुरक्षित वातावरणात सराव करता येणार आहे. 

मिलिंद भारंबे (पोलीस आयुक्त, नवी मुंबई)

सध्या ही रेंज प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली असून, यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांसोबतच खासगी शस्त्र परवानाधारकांना सर्व ऋतूंमध्ये सुरक्षित आणि नियंत्रित वातावरणात अचूक नेमबाजीचा सराव करणे शक्य होणार आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

फ्रीजचा कंप्रेसर फुटून घराला आग