टिटवाळा पश्चिमेतील रस्त्यासाठी रहिवाशांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
कल्याण : टिटवाळा रेल्वे स्टेशन पासून सिध्देश्वर हाईटस आणि अश्लर तत्व सोसायटी पर्यंत जाण्यासाठी नागरिकांना रस्ताच नसल्याने टिटवाळा पश्चिमेतील या रस्त्यासाठी नागरिकांनी मुख्यमंत्री, आयुक्त, तहसीलदार यांना पत्राद्वारे विनवणी केली आहे.
‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण'ने नागरी पायाभुत सुविधा प्रकल्प अंतर्गत मांडा टिटवाळा (पश्चिम) रेल्वेस्टेशन ते सिध्देश्वर हाईटस ते अश्लर तत्व सोसायटी पर्यंत १८ मीटर रुंदीचा डी.पी. रोड बनविण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास विभाग तथा अध्यक्ष, एमएमआरडीए यांच्यातर्फे अश्लर तत्व सोसायटी पासून सिध्देश्वर हाईटसचे दरम्यान ६ मीटर रुंदीचा रस्ता दोन ते अडीच महिन्यापूर्वी बनवून दिला होता. त्यासाठी महापालिकेने साधारणतः ८५ लाखाचा निधी देखील वापरलेला आहे. मात्र, सदर डी.पी. रोडवर स्थानिक व्यक्तीकडून चाळ बांधून अतिक्रमण करण्यात आलेले आहे.
या अतिक्रमणावर महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. त्यावर संबंधित इसमाने अतिक्रमण करुन तो पर्यायी रस्ता अश्लर तत्व सोसायटीचे रहिवासी आणि त्यापुढील लोकांसाठी बंद केलेला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाचा निधीचा वापर करुन जो नियमाप्रमाणे १८ मीटर रुंदीचा रस्ता होणे गरजेचे असून देखील तसे न होता आणि साधारणतः ८५ लाखाचा निधी खर्च करुन १८ मीटर ऐवजी ६ मीटर रुंदीचा रस्ता तयार करण्यात आलेला आहे. तेथे सद्यःस्थितीत साधारणतः १२२ सदनिकाधारक असून त्यामध्ये साधारणतः ४०० ते ५०० नागरिक राहत आहेत. सदर रहिवाशांना आज रोजी जाण्या-येण्यासाठी रस्ताच उपलब्ध नाही. त्यामुळे या नागरिकांना एकप्रकारे जेरबंद करण्यात आलेले आहे.
त्यामुळे एखाद्या आजारी व्यक्तीला दवाखान्यात न्यावयाचे असेल तर ॲम्बुलन्स देखील त्या ठिकाणी येवू शकत नाही. तसेच रोजच्या शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. प्रस्तावित १८ मीटर डी.पी. रस्ता मंजूर असुनही काही व्यक्तीच्या आडमुठेपणामुळे रस्ता तयार होत नाही आणि पर्यायी रस्ता महापालिकेने दिला, त्यावर देखील अतिक्रमण होत असल्यास याची दखल तातडीने घेवून योग्य ती कार्यवाही संबंधितांकडून व्हावी. आम्हाला आमचा हक्काचा रस्ता उपलब्ध करुन द्यावा, अशा मागणीचे पत्र अश्लर तत्व सोसायटीच्या आणि इतर नागरिकांनी आपल्या सह्यांनीशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केडीएमसी आयुक्त अभिनय गोयल तसेच कल्याण तहसीलदार, कल्याण तालुका पोलीस स्टेशन आदिंना देऊन न्यायाची मागणी केलेली आहे.