पामबीच सानपाडा येथील भुयारी मार्गाच्या निर्मितीला उच्च न्यायालयाची मंजुरी

नवी मुंबई : पामबीच मार्गावरील सानपाडा, सेवटर-१९ सोनखार मधील केसर सॉलीटेअर येथून पामबीच मार्गाखालून वाहनचलित भुयारी मार्गाच्या निर्मितीला हायकोर्टाकडून परवानगी प्राप्त झाली आहे. त्यामुळे सानपाडा मोराज येथे होणारी वाहतूक कोंडी लवकरच फुटणार आहे. 

या विभागातील माजी नगरसेविका वैजयंती दशरथ भगत आणि रुपाली भगत यांनी महापालिकाकडे वन विभागाकडे सातत्याने याबाबतची मागणी लावून धरली होती. जनहिताच्या बाजूने लागलेल्या या निर्णयामुळे दोन्हीही माजी नगरसेविकांनी उच्च न्यायालयासह राज्याचे वनमंत्री ना. गणेश नाईक यांचे विशेष आभार मानले आहेत. सोबतच याकामी जलद कार्यवाही करणारे नवी मुंबई महापालिका आयुक्त यांच्यासह जनतेने दिलेल्या भक्कम पाठिंब्याबद्दल आभारी आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या परवानगी मुळे आता नवी मुंबई महापालिकेस आता वन विभागाच्या हरकती विना प्रस्तावित ठिकाणी भुयारी मार्गाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. पामबीच लगत असलेल्या मोराज सोसायटी समोरील चौकात प्रतिदिन वाहतूक कोंडीतून आता सोनखार-पामबीच विभागातील सेक्टर-१, १३ ते १९ सेक्टर्स मधील रहिवाशांसह संपूर्ण सानपाडा नोड मधील सानपाडा गांव, सेक्टर-२ ते सेक्टर-११ मधील तसेच जुईनगर मधील रहिवाशांना दैनंदिन वाहतूक कोंडीतून कायमची मुक्ती मिळणार आहे. 

भुयारी मार्गाचा प्रकल्प सीआरझेड क्षेत्रात येत असल्याने बांधकामासाठी मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी आवश्यक असून नवी मुंबई महापालिकेने परवानगी मिळावी म्हणून हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. प्रकल्पासाठी कोणतेही कांदळवन तोडण्यात येणार नाहीत. तसेच सीआरझेड कायद्याचे उल्लंघन होणार नसल्याचे न्यायालयाने नमूद करत २ वर्षांपूर्वी निविदा प्रक्रिया झालेल्या या भुयारी मार्गाच्या प्रकल्पाला परवानगी देऊन न्यायालयाने सदर याचिका निकाली काढली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘महापरिनिर्वाण दिन'साठी सुरक्षेसह सेवा-सुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा-  मुख्यमंत्री फडणवीस