भाईंदरच्या ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांची धाड
भाईंदर : भाईंदर पूर्वेकडील नवघर भागातील अण्णा पॅलेस या आर्केस्ट्रा डान्सबारवर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या परिमंडळ एकने धाड टाकली. ऑर्केस्ट्रा बारमधील एक गुप्त खोली तोडून ६ मुलींची सुटका केली आहे. तसेच १३ मुली आणि १३ ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
भाईंदर पूर्वेकडील नवघर फाटक रस्त्यावरील अण्णा पॅलेस या ऑर्केस्ट्रा बारमध्ये अनधिकृतपणे डान्सबार चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या काशिमिरा गुन्हे प्रकटीकरण शाखा क्रमांक एकने २३ एप्रिल रोजी रात्री अण्णा पॅलेसवर धाड टाकली असता काही मुली गायब झाल्याचे लक्षात आले. शोध घेतला असता बारच्या एका गुप्त खोलीमध्ये त्यांना लपविण्यात आले होते. ती खोली तोडून पोलिसांनी ६ मुलींची सुटका केली आहे. तसेच इतर १३ मुली आणि डान्सबारची मजा घेणारे १३ ग्राहक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच बारचा चालक व मालक यांच्यावरसुद्धा गुन्हे नोंदविण्याचा कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. हा ऑर्केस्ट्रा बार पालिकेकडून अनधिकृत घोषित करण्यात आला आहे.