प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
मिरा-भाईंदर महापालिकातर्फे मतदान जनजागृती
भाईंदर: ‘राज्य निवडणूक आयोग'ने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार मिरा-भाईंदर महापालिका निवडणूक अधिकारी तथा आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी उत्तन येथील दर्यामाता धर्म मंदिर येथे मतदान जनजागृती अभियानाचे आयोजन केले होते.
मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात मतदान जागृती करण्यासाठी आणि मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी महापालिकामार्फत विविध अभियान राबविले जात आहेत. नाताळ सणानिमित्ताने राबविलेल्या अभियानांत माहिती-जनसंपर्क अधिकारी राजकुमार घरत यांनी उपस्थित नागरिकांना मतदानाविषयी जागृत करुन मतदान करणे किती महत्वाचे आहे, याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवण्यासाठी मतदानाची शपथ देण्यात आली. उपस्थित नागरिकांना आगामी निवडणुकीत निर्भय आणि जबाबदारीने मतदान करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
येत्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, अधिकाधिक नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि लोकशाही अधिक बळकट व्हावी, यासाठी सर्व मतदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या अभियानाला अवंतिका भोईर, एलरिटा मळेकर, इतर पदाधिकारी, कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.