प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
स्पोर्टस् बाईकच्या वेगाचा थरार जीवावर बेतला
पनवेल : रस्त्यावरील मोकळीक आणि हातामध्ये असलेली हाय-स्पीड स्पोर्टस् बाईक यातून मिळणारा थरार तरुणाच्या आयुष्याचा शेवट करणारा ठरला आहे. पनवेल मधील पळस्पे-गव्हाणफाटा रोडवर झालेल्या भीषण अपघातात २९ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. भरधाव वेगात असलेल्या स्पोर्टस् बाईकवरील नियंत्रण सुटल्याने सदर अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव चिन्मय सुनिल माळी (२९) असे असून तो घणसोली येथील अरुण टॉवरमध्ये राहत होता. चिन्मयला स्पोर्टस् बाईकची आवड असल्याने त्याने २५ लाख रुपये किंमतीची स्पोर्टस् बाईक घेतली होती. या बाईकवरुन चिन्मय आपल्या मित्रांसोबत सुट्टीच्या दिवशी बाईक रायडींगसाठी जात होता. ३१ जानेवारी रोजी सकाळी देखील तो आपल्या मित्रांसोबत खोपोली येथे बाईक रायडींगसाठी गेला होता. त्यानंतर ११.३० वाजण्याच्या सुमारास चिन्मय आणि त्याचे मित्र नवी मुंबईत परतत होते. यावेळी चिन्मयचे सर्व मित्र पुढे गेले होते, तर चिन्मय पाठीमागे राहिला होता.
११.४५ वाजण्याच्या सुमारास चिन्मय पळस्पे-गव्हाणफाटा रोडवरील साई वर्ल्ड येथील ब्रिजवर आला होता. रस्ता रिकामा असल्याने चिन्मय प्रचंड वेगाने जात होता. याचवेळी चिन्मयचे आपल्या बाईकवरील नियंत्रण सुटल्याने त्याची बाईक थेट रस्ता दुभाजक ओलांडून विरुध्द दिशेने येणाऱ्या वॅगनार कारवर आणि त्यानंतर हुंडाई आय टेन कारवर जोरात धडकली. धडक इतकी भीषण होती की, चिन्मय गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडला.
चिन्मय पुढे न आल्याने त्याच्या सोबत असलेले मित्र त्याला पाहण्यासाठी पाठीमागे आले असता, त्यांना चिन्मय गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या अपघाताला मृत चिन्मय हाच जबाबदार असल्याचे आढळून आल्याने पनवेल शहर पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
चिन्मयच्या स्पोर्टस् बाईक ताशी ३०० कि.मी.ने धावणारी होती. त्यामुळे अपघाताच्या वेळी त्याच्या बाईकचा वेग ताशी १०० कि.मी.पेक्षा जास्त असल्याचे आणि तो या वेगाचाच बळी ठरल्याचे बोलले जात आहे. या अपघातात वॅगनार कार आणि हुंडाई आय टेन या दोन कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.