6 वर्षांच्या विवानचा विश्वविक्रम !
नवी मुंबई : वाशीत राहणाऱया विवान अग्रवाल या 6 वर्षाच्या चिमुकल्याने अवघ्या 6 मिनिटे 16 सेकंदात जगातील 195 देशांचे ध्वज अचूक ओळखून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. विवान च्या या विक्रमाची नोंद इन्जिनियस चार्म वर्ल्ड रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये झाली आहे. इतक्या लहान वयात हा विक्रम करणारा तो देशातील सर्वात लहान विजेता ठरला आहे. चिमुकल्या विवानच्या विश्वविक्रमाची इतक्या कमी वयात नोंद झाल्याने त्याच्या तिक्ष्ण बुद्धिमत्तेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अव्हालॉन हाइट्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता 2 मध्ये शिकणारा हा बाल विजेता लॅपटॉपच्या स्क्रीनवर दाखवण्यात आलेल्या ध्वजांची झटपट ओळख करीत त्यांच्या देशांची नावे अचूक सांगत गेला, आणि पाहता पाहता जगातील सर्व देशांवर आपला ज्ञानध्वज फडकावला! या विलक्षण कामगिरीला ऑल इंडिया स्पोर्ट्स अँड रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज क्लब (एआयएसआरएसी) चे अध्यक्ष आनंद राजेन्द्रन यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकृत मान्यता मिळाली आहे.
विवान च्या नावाची नोंद इन्जिनियस चार्म वर्ल्ड रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये झाली असून, इतक्या लहान वयात हा विक्रम करणारा तो देशातील सर्वात लहान विजेता ठरला आहे. विवानच्या या बुद्धिमत्तेच्या झळाळीमागे, त्याची जिज्ञासू वृत्ती, तीक्ष्ण स्मरणशक्ती आणि शिकण्याची अखंड ओढ आहे. जगातील भौगोलिक विविधतेबद्दल त्याची आवड पाहता शिक्षकांनी त्याला लहानसा ग्लोबल सिटिझन असे नाव दिले आहे.
त्याचे पालक सपना अग्रवाल आणि राजकुमार अग्रवाल यांनी आपल्या मुलाच्या या कामगिरीबद्दल अपार आनंद व्यक्त केला आहे. हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. विवानचे जगाबद्दलचे कुतूहल आणि शिकण्याची आवड त्याला अजून उंचीवर नेईल, असे त्यांनी सांगितले. शाळेचे शिक्षक, त्याच्यासह शिकणारे विद्यार्थी आणि पालक मंडळींनी विवानचे कौतुक करत त्याला नवी मुंबईचा लहानसा विश्वदुत म्हटले आहे.
असामान्य यश मिळवण्यासाठी वयाची कधीच मर्यादा नसते, इच्छाशक्ती आणि जिद्दच खरी ताकद असते! हे चिमुकल्या विवानने सिद्ध केले आहे. नवी मुंबईच्या या बालप्रतिभेने जगभरात भारतीय बुद्धिमत्तेचा आणि क्षमतेचा झेंडा फडकावला आहे. भविष्यात विवान कोणत्या नव्या उंचीवर पोहोचतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.