प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
ई-गव्हर्नन्स सुधारणा मुल्यांकनात ‘नमुंमपा'ला राज्यस्तरीय चतुर्थ मानांकन
नवी मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत झालेल्या राज्यस्तरीय मूल्यमापनात नवी मुंबई महापालिकेने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यातील २९ महापालिकांमध्ये मानाचा चौथा क्रमांक पटकावला आहे. सदर कामगिरी नवी मुंबईकर नागरिकांसाठी अभिमानास्पद आहे.
मागील वर्षभरापासून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महापालिकेने नागरिकांना ऑनलाईन सेवा पुरविण्याकडे भर दिला असून जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन दिल्या आहेत. यामध्ये नागरिकांना करभरणा करणे असो की महापालिकेशी संबंधित जन्म-मृत्यू प्रमाणपत्रापासून वेगवेगळ्या सेवा उपलब्ध करुन घेणे असो, सुविधांविषयी तक्रार-सूचना करणे असो की महापालिकेशी संबंधित माहिती मिळविणे असो - अशा सर्वच बाबींमध्ये वेबसाईट, माय एनएमएमसी ॲप, शासनाच्या आपले सरकार पोर्टलशी संलग्नता, व्हॉटस्ॲप चॅटबॉट, डॅशबोर्ड, ई-ऑफिस, एआय, ब्लॉकचेन, जीआयएस आधारित सेवा अशा विविध प्रकारे ऑनलाईन सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. या सर्व बाबींचे सखोल मूल्यमापन क्यूसीआय सारख्या नामांकित त्रयस्थ संस्थेमार्फत १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमामध्ये करण्यात आले.
वेबसाईट अनुपालन मूल्यमापनांतर्गत ‘नमुंमपा'च्या अधिकृत संकेतस्थळामध्ये वापरकर्ता-सुलभ इंटरफेस, सर्वसमावेशक सुलभता, नियमितपणे अद्ययावत होणारी माहिती, प्रभावी शोध सुविधा, उच्च दर्जाची माहिती सुरक्षा, नागरिकांसाठी अभिप्राय आणि तक्रार निवारणाची सक्षम यंत्रणा तसेच शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अनुपालन-प्रमाणन अशी सर्व आवश्यक वैशिष्ट्ये प्रभावीपणे उपलब्ध असल्याचे आढळून आले.
‘आपले सरकार' उपक्रमांतर्गत नवी मुंबई महापालिकेने ६८ लोकसेवांची ऑनलाईन उपलब्धता केलेली असून त्यांचे ‘आपले सरकार पोर्टल'शी प्रभावी एकात्मिकरण केले आहे. या व्यतिरिक्त ३९ महापालिकेशी संबंधित सेवाही ऑनलाईन उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सेवा वितरणाचा कालावधी कमी करण्यासाठी शासन प्रक्रियेची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. तसेच नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत आणि प्रभावी निराकरण होण्यासाठी सक्षम तक्रार निवारण यंत्रणा कार्यरत असल्याचे मूल्यमापनात निदर्शनास आले.
ई-ऑफिस अनुपालन मूल्यमापनांतर्गत ‘नमुंमपा'मध्ये राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र विकसित ई-ऑफिस प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली असून १ हजारपेक्षा अधिक अधिकारी-कर्मचारी या प्रणालीचा नियमित वापर करीत आहेत. यामुळे कार्यालयीन कामकाजात वेग, पारदर्शकता आली असून कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे.
डॅशबोर्ड अनुपालन मूल्यमापनांतर्गत महापालिकेने प्रशासकीय निर्णय प्रक्रियेसाठी प्रभावी डॅशबोर्ड प्रणाली विकसित केली असून, सर्व विभागांच्या महत्त्वाच्या निर्णयात्मक क्षेत्रांची माहिती एकाच डॅशबोर्डवर उपलब्ध आहे. या डॅशबोर्डच्या आधारे विभागप्रमुखांच्या बैठका घेण्यात येतात. तसेच रिअल-टाईम अद्ययावत माहिती उपलब्ध असल्यामुळे वेळेवर आणि अचूक निर्णय घेणे सुलभ झाले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने डिजिटल प्रशासन, पारदर्शकता, नागरिक-केंद्रित सेवा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यावर सातत्याने भर दिल्यामुळे राज्यातील २९ महापालिकांमध्ये १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत झालेल्या राज्यस्तरीय मूल्यमापनात राज्यात चतुर्थ क्रमांकाचे यशस्वी मानांकन महापालिकेने संपादन केले आहे. त्याबद्दल नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन. आगामी काळात नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी नवी मुंबई महापालिका विविध डिजीटल माध्यमांचा उपयोग करुन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत राहील.
-डॉ. कैलास शिंदे, आयुवत-नवी मुंबई महापालिका.