अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाले, रिक्षाचालकांचा ‘कब्जा'
अंबरनाथ : अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसराला रिक्षाचालक आणि फेरीवाल्यांनी वेढा घातला आहे. यामुळे पादचारी आणि वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक काेंडीची गंभीर समस्या कायमस्वरुपी सोडवण्यात अंबरनाथ नगरपरिषद प्रशासन आणि पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. नगरपरिषद प्रशासन आणि पोलीस यांच्या रिक्षाचालक आणि फेरीवाल्यांवरील कामचलाऊ कारवाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
न्यायालयाने रेल्वे स्थानकापासून १०० मीटरच्या आत फेरीवाल्यांना आणि रिक्षाचालकांना मनाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या निर्देशांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नगरपरिषद प्रशासन आणि पोलिसांची असतानाही, अंबरनाथ पूर्व येथील रेल्वे स्थानकाजवळील परिसरात फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते आणि रिक्षाचालकांनी अक्षरशः कब्जा केला आहे.
अंबरनाथ पूर्व येथील रेल्वे स्थानकाजवळील परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कानसई रस्ता, बी-कॅबिन रस्ता, एमआयडीसी रस्ता, उड्डाणपुलाला जोडणारा रस्ते, जोड रस्ते तसेच फुटपाथवर रिक्षा स्टँड आणि फेरीवाल्यांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे दररोज वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या वाहतूक कोंडीतून अनेकदा वाहन चालक, पादचारी, रिक्षाचालक आणि फेरीवाल्यांमध्ये शाब्दिक वाद आणि हाणामारीचे प्रसंग घडतात.
काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे (मनसे) फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करत अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसरातून फेरीवाल्यांना कायमस्वरुपी हटवण्याची मागणी करण्यात आली होती. या आंदोलनानंतर काही दिवस अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसरातून फेरीवाले हटल्यानंतर नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, काही दिवसानंतर पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे' झाली असून फेरीवाले आणि रिक्षाचालकांनी अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यांवर पुन्हा कब्जा केला आहे.
अंबरनाथ नगरपरिषद प्रशासन फेरीवाल्यांविरोधात केवळ दिखाव्यापुरती आणि कामचलाऊ कारवाई करते, असा नागरिकांचा आरोप आहे. विशेष म्हणजे, अतिक्रमण विरोधी पथकाचे काही कर्मचारी आणि फेरीवाल्यांमध्ये साटेलोटे असल्याचा आणि कारवाईची पूर्वसूचना फेरीवाल्यांना दिली जाते, असा थेट आरोप काही नागरिकांनी केला आहे.
दरम्यान, अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसरात सॅटिस प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची घोषणा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती. मात्र, सॅटिस प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने कोणतीही पाऊल अद्याप उचललेले असल्याचे दिसून येत नाही. सध्या नगरपरिषद निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष व्यस्त आहेत. परंतु, फेरीवाले, बेशिस्त रिक्षाचालक आणि वाहतूक कोंडीच्या प्रश्नाकडे एकाही राजकीय पक्षाने गांभीर्याने लक्ष दिलेले नाही, अशी खंत महाविद्यालयीन विद्यार्थी सुनील कदम याने व्यक्त केली.