‘अभय योजना'मध्ये १५ ऑक्टोंबर पर्यंत ७५ टक्के कर सवलत

पनवेल : पनवेल महापालिका मालमत्ता कर विभागामार्फत करदात्यांना दिलासा देण्यासाठी ‘अभय योजना' राबविण्यात येत आहे. आयुक्त मंगेश चितळे यांच्या सुचनेनुसार १५ ऑक्टोंबर पर्यंत शास्तीवर ७५ टक्के सुट देण्यात आली आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. या ‘अभय योजना'चा मालमत्ताधारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. ‘अभय योजना' अंतर्गत आत्तापर्यंत सवलतीसह ५६६ कोटी रुपयांचा कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.

याआधी महापालिकेने करदात्यांना शास्तीमध्ये तब्बल ९० टक्के सवलत होती.  त्यानंतर आता १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत मालमत्ता कर भरणाऱ्यांना ७५ टक्के शास्ती माफी मिळणार आहे.

महापालिकेकडून नागरिकांना विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यात आले आहे. करदात्यांनी ई-बिल स्वीकारणे, डिजिटल पध्दतीने कर भरणे यामुळे थेट २ टक्के सवलत मिळू शकते. तसेच ऊर्जा बचत करणारे सौर पॅनल, शेड नेट, वॉटर हार्वेस्टिंग अशा उपाययोजना केल्यास करामध्ये २ टक्के सवलत दिली जाणार आहे. याशिवाय घनकचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट करणाऱ्या सोसायट्यांना नियमानुसार करात २ टक्के सवलत मिळणार आहे.

कर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी महापालिकेचे panvelmc.org हे संकेतस्थळ तसेच PMC TAX APP आणि Panvel Connect App उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामुळे करदात्यांना घरबसल्या ऑनलाईन कर भरण्याची सुविधा मिळत आहे.

दरम्यान, सदर अंतिम मुदतवाढ लक्षात घेऊन दिलेल्या शास्तीमाफी आणि सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका उपायुवत स्वरुप खारगे यांनी नागरिकांना केले आहे.

कर-मित्र चॅटबॉट सेवा सुरु...
नागरिकांना अधिक सोयीस्कर, वेगवान आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने कर-मित्र चॅटबॉट सेवा सुरु केली आहे. सदर अत्याधुनिक चॅटबॉट मालमत्ता करदात्यांना घरबसल्या त्वरित माहिती, मार्गदर्शन आणि ऑनलाईन मदत पुरवित आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई विमानतळ समृध्दी-विकासाचे प्रतिक -पंतप्रधान