पनवेल महापालिकेच्या शास्ती माफीला मुदतवाढ
पनवेल : पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत करदात्यांना दिलासा देण्यासाठी ‘अभय योजना' राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या वाढत्या मागणीनुसार आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार या योजनेत शास्तीमध्ये अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे .यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. आता ३०सप्टेंबर पर्यंत शास्तीवर ९० टक्के सूट राहणार आहे. अभय योजना अंतर्गत आत्तापर्यंत ५२४ कोटींचा कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.
१६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत मालमत्ता कराची थकबाकी भरल्यास करदात्यांना शास्तीमध्ये तब्बल ९० टक्के सवलत मिळणार आहे. त्यानंतर १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२५ दरम्यान कर भरणाऱ्यांना ७५ टक्के शास्ती माफी मिळणार आहे.
महापालिकेकडून नागरिकांना विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यात आले आहे. करदात्यांनी ई-बिल स्वीकारणे, डिजिटल पध्दतीने कर भरणे यामुळे थेट २ टक्के सवलत मिळू शकते. तसेच ऊर्जा बचत करणारे सौर पॅनल, वॉटर हार्वेस्टिंग अशा उपाययोजना केल्यास करामध्ये २ टक्के सवलत दिली जाणार आहे. याशिवाय घनकचऱ्याची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट करणाऱ्या सोसायट्यांना नियमानुसार २ टक्के करात सवलती मिळणार आहे.
कर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी महापालिकेचे panvelmc.org असे संकेतस्थळ तसेच PMC TAX APP उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यामुळे करदात्यांना घरबसल्या ऑनलाईन कर भरण्याची सुविधा मिळत आहे.
अभय योजना अंतर्गंत शास्ती माफीमधील ही अंतिम मुदतवाढ लक्षात घेऊन नागरिकांनी थकबाकी त्वरित भरुन दिलेल्या शास्ती माफी आणि सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपायुक्त स्वरुप खारगे यांनी केले आहे.
कर-मित्र चॅटबॉट सुविधा सुरु...
नागरिकांना अधिक सोयीस्कर, वेगवान आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी पनवेल महापालिकेने कर-मित्र चॅटबॉटची सुविधा सुरु करण्यात आली आहे. सदर अत्याधुनिक चॅटबॉट मालमत्ता करदात्यांना घरबसल्या त्वरित माहिती, मार्गदर्शन आणि ऑनलाइन मदत पुरवेल.