प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी भकास केलेल्या शहराचा चेहरा महायुतीच्या विजयाने बदलेले - देवेंद्र फडणवीस
भिवंडी : भिवंडी महापालिकेत वर्षांवर्षे सत्ता उपभोगणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी शहराचा चेहरा भकास करून ठेवला आहे.तो चेहरा बदलण्यासाठी भाजपा शिवाय पर्याय नाही,त्यासाठी भिवंडीकरांनी सहा भाजपा सदस्य बिनविरोध निवडून दिले आहेत.आता सत्ता महायुतीची येऊन महापौर बसल्यावर ते ज्या निधीचा विकास आराखडा घेऊन येतील त्याला मंजुरी मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.ते बुधवारी भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महायुतीच्या उमेदवारांसाठी आयोजित विजय संकल्प सभेत बोलत होते.याप्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील,आमदार महेश चौघुले,शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे,प्रदेश सचिव अँड. माधवी नाईक,शहराध्यक्ष रवी सावंत,शिवसेना शहराध्यक्ष श्याम पाटील,आर पी आय शहराध्यक्ष महेंद्र गायकवाड सर्व उमेदवार व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.ऐतिहासिक परंपरा असलेल्या भिवंडी शहरात ११ तलाव होते आज त्यापैकी फक्त ५ शिल्लक राहिले आहेत.या शहराच्या विकासाची मानसिकता सत्ताधाऱ्यांची नाही ती फक्त भाजपामध्ये आहे.या पालिका सत्तेला ए टी एम म्हणून बघणाऱ्यांना बाजूला सारण्याची वेळ आली आहे.
या शहराच्या विकासाची काळजी महायुती सरकारने केली म्हणून शहरात रस्ते काँक्रीटीकरण,मेट्रो प्रकल्प कार्यान्वित झाला.मेट्रो प्रकल्प ५ चा ठाणे ते भिवंडी हा पहिला टप्पा २०२७ मध्ये तर पुढील भिवंडी ते कल्याण हा दुसरा टप्पा त्यापुढील दोन वर्षात कार्यान्वित करणार.येथील वाहतूक कोंडी ची सोडवणूक करण्यासाठी रस्ते रुंदीकरण,उड्डाणपूल,भुयारी मार्गांच्या माध्यमातून मार्ग काढला जाईल असा विश्वास व्यक्त करीत,ज्या ज्या ठिकाणी भाजपाचा महापौर निवडून दिला त्या शहराचा चेहरा बदलला.आम्ही पाहिजे तेवढा निधी द्यायला तयार आहोत पण जनतेच्या विकासा ऐवजी स्वतःच विकास करणारे निवडून दिले तर पुन्हा शहर चुकीच्या वाटेने जाईल.आम्ही जे बोलतो ते करतो म्हणून भिवंडी पालिकेची सत्ता भाजपाच्या हाती सोपवा असे सांगत जोपर्यंत देवभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही.आता बहिणींना लाडकी बहीण ठेवून थांबवणार नाही त्यांना लखपती दीदी करणार आहोत,असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी शेवटी केले.सभेच्या तत्पूर्वी अँड माधवी नाईक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या शुभहस्ते वचननाम्याचे प्रकाशन करण्यात आले.