एपीएमसी येथे १६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता पथकाची कारवाई  

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई आचारसंहिता पथकाकडून वाहनातून बेकायदेशीररित्या नेली जाणारी रोकड पकडण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर ९ जानेवारी रोजी दुपारी एपीएमसी मधील अरेंजा सर्कल येथील चौकातून जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या मर्सिडीज कारची आचारसंहिता पथकाने तपासणी केली असता, त्यात १६.१६ लाखांची रोख रक्कम सापडली. आचारसंहिता पथकाने सदर रक्कम जप्त करुन कार चालकाला पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.    

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या कालावधीत कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. ‘निवडणूक आयोग'कडून लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे ‘राज्य निवडणूक आयोग'च्या आदेशानुसार शहरात प्रवेशद्वारांवर तसेच प्रमुख ठिकाणी एकूण २७ स्थिर संनिरीक्षण पथके तैनात करण्यात आली आहेत. सदर पथके दिवसाच्या तिन्ही सत्रांत २४ तास वाहनांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांची तपासणी करत आहेत.  

९ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास एपीएमसीतील अरेंजा सर्कलवरुन जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या मर्सिडीज कारची एपीएमसी मार्केट जवळील चेक पोस्टवर कर्तव्यावर असलेल्या आचारसंहिता पथकाने तपासणी केली. यावेळी सदर कारमध्ये १६ लाख १६ हजाराची रोख रक्कम आढळून आली. यावेळी कार चालकाला त्याच्या कारमध्ये सापडलेल्या रोख रक्कमेबाबत योग्य माहिती देता आली नाही. त्यामुळे आचारसंहिता पथकाने सदर रक्कम जप्त केली आहे.  

सदर कारवाई सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सागर मोरे, आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी अमोल पालवे,  तुषार दौंडकर, अधीक्षक-वसुली अधिकारी संजय गायकवाड, पोलीस नाईक सचिन सूर्यवंशी, एसएसटी पथक प्रमुख अजय शेलार यांनी केली. जप्त केलेल्या रोख रक्कमेबाबत पुढील चौकशी आणि कायदेशीर कार्यवाही सुरु असून याबाबत ‘निवडणूक आयोग'ला कळविण्यात आल्याचे महापालिका अधिकाऱ्यांंनी सांगितले. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

२७ कोटींचे १३ किलो एमडी जप्त