प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
विरोधकांकडून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम - कपिल पाटील
कल्याण : नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीबाबत विरोधकांकडून पोलिसांनी नेले, दबाव टाकला असे आरोप दिशाभूल करणारे जनतेमध्ये संभ्रम निर्माण करुन मते डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची टीका माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी केली आहे.
टिटवाळा येथे प्रभाग क्र.३ मध्ये भाजपा उमेदवार माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, संतोष तरे, ‘शिवसेना'चे बंदेश जाधव तसेच हर्षाली चौधरी थवील असे ‘महायुती'च्या ४ उमेदवारांच्या निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी कपिल पाटील पत्रकारांशी बोलत होते.
ठाणेमध्ये बिनविरोध नगरसेवक निवड करण्यासाठी पोलीसच उमेदवाराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे घेऊन गेल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांनी केला आहे. या आरोपाला प्रत्युत्तर देताना माजी मंत्री कपिल पाटील यांनी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवला. सगळे एकत्र येऊन काही चालत नाही म्हणून ‘भाजपा'ला बदनाम करण्याचे काम करीत आहेत. बिनविरोध निवडी बाबत विरोधकांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिल्याबाबत कपिल पाटील यांनी राज्यात, देशात ज्या ज्या तरतुदी आहेत, त्याचा त्यांनी फायदा घ्यावा. जिथे कायद्याने अधिकार दिलाय त्या ठिकाणी त्यांनी समाधान होईपर्यंत न्याय मागावा, असा टोला लगावला.
उमेदवारांना पोलीसच ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे घेऊन गेल्याचे त्यांनी सांगितल्याचे सर्वांनी मान्य केले. मात्र, त्याच ‘मनसे'च्या उमेदवाराने माझ्या मर्जीने मी दुसऱ्या कामासाठी बाहेर गेलो, असे स्पष्ट केले आहे. जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम विरोधक करत आहेत, यांना काहीतरी निगेटिव्ह पाहिजे. जनतेला संभ्रमामध्ये टाकायचें जनतेची दिशाभूल करायची आणि मते आपल्याला कशी मिळतील, ते बघायचे विरोधकांचे काम सुरु आहे. तर तुमचेही बिनविरोध आले असते; मात्र तुम्ही प्रयत्नच केले नाही. प्रयत्न करावे लागतात आपोआप कोणी बिनविरोध होत नाही, असा टोला देखील कपिल पाटील यांनी यावेळी लगावला.
कपिल पाटील यांनी ‘महायुतीे'च्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. याप्रसंगी ‘शिवसेना'चे कल्याण पश्चिम शहरप्रमुख रवी पाटील, प्रेमनाथ म्हात्रे, शक्तिवान भोईर, स्वप्निल काटे, मधुकर भोईर, विजय भोईर, श्रीधर खिसमतराव, दीपक कांबळे, रमण तरे, ज्ञानेश्वर मढवी, आदि उपस्थित होते.