कोपरी येथील वादग्रस्त मलनिस्सारण प्रकल्पाची महापौर,आयुक्ताकडून पाहणी

ठाणे : कोपरी येथील सांडपाण्यापासून शुध्द पाणीनिर्मिती करणाऱ्या वादग्रस्त मलनिस्सारण प्रकल्पाची पाहणी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी २८ एप्रिल रोजी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत केली. पाहणी करत असताना या प्रकल्पामध्ये आढळलेल्या त्रुटींबाबत महापौरांनी अधिकाऱ्यांना खडसावले व १५ दिवसांत या संपूर्ण प्रकल्पाची माहिती सादर करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहे.

या पाहणी दौऱ्यास अतिरिक्त आयुक्त २प्रशांत रोडे, स्थानिक नगरसेविका मालती पाटील, नम्रता पमनानी, नगरसेवक मनोहर डुंबरे, नगरअभियंता प्रशांत सोनग्रा, अग्निशमन विभागाचे गिरीष झळके, कार्यकारी अभियंता गुणवंत झांबरे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कोपरी येथील मलप्रक्रिया केंद्राच्या उन्नतीकरणाचा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी (झ्झ्झ्) तत्वावर राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत कंत्राटदाराने स्वतःच्या भांडवली गुंतवणुकीतून टर्शरी ट्रिटमेंट प्लांट आणि वीज निर्मिती युनिट उभारून त्यांचे संचालन व देखभाल करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे, परंतु असे होत नसल्याचे पाहणीदौऱ्यात महापौरांच्या निदर्शनास आले.

या प्रकल्पात ५ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा टर्शरी ट्रिटमेंट प्लांट उभारण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी कोणताही भांडवली खर्च महापालिकेवर न टाकता कंत्राटदाराने स्वतःच्या खर्चातून काम पूर्ण केले आहे. तसेच, ५००किलोवॅट क्षमतेची सौरऊर्जा प्रणाली बसविण्यात आली आहे.  या प्रकल्पातील प्रक्रिया केलेल्या पाण्यापैकी १०टक्के पाणी महापालिकेला दिले जात आहे, तर उर्वारित पाण्याच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी १०टक्के हिस्सा महापालिकेला देण्याची तरतूद आहे. मात्र याचे संचलन व्यवस्थितरित्या होत नसून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी प्रशासनास निर्देश दिले असून याबाबतची सर्व माहिती येत्या १५ दिवसात सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनास दिल्या.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘डेअरी ॲनालॉग'पासून सावधान!