प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
समाज घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण तत्पर - जिल्हा-सत्र न्यायाधीश सावंत
अलिबाग : विधी सेवा महाशिबिर, शासकीय सेवा आणि योजना महामेळाव्याचे कुरुळ येथील आरसीएस सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या महामेळाव्याचे उद्घाटन प्रमुख जिल्हा-सत्र न्यायाधीश आणि ‘जिल्हा विधी सेवा समिती'चे अध्यक्ष राजेंद्र सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी किशन जावळे, ‘जिल्हा परिषद'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, ‘जिल्हाविधी सेवा समिती'च्या सचिव तेजस्विनी निराळे, जिल्हा सरकारी वकील ॲड. संतोष पवार, ‘अलिबाग बार असोसिएशन'चे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील, जिल्ह्यातील न्यायालयातील न्यायाधिश, शासनाच्या विविध खात्याचे अधिकारी, जिल्हा आणि जिल्ह्यातील तालुका विधी सेवा समिती मधील वकील वर्ग, अनेक मान्यवर, शासकीय कर्मचारी तसेच बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
‘विधी सेवा समिती'च्या माध्यमातून जिल्हा-तालुका स्तरावर वेळोवेळी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरे घेण्यात येत असतात. अनेक बाबतीत मोफत कायदेविषयक सेवा पुरविली जाते. ‘विधी सेवा समिती'च्या या कार्याची माहिती सर्वांना व्हावी तसेच सर्वांसाठी न्याय संकल्पना सर्वत्र पोहोचावी आणि समाजातील सर्व घटकांना तातडीने न्याय मिळावा, यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदैव तत्पर आहे. या महामेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शासनाच्या विविध कल्याणकारी योजना समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे आणि त्यांना योजनांचा थेट लाभ मिळवून देणे आहे. ‘जिल्हा विधी प्राधिकरण'मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील गरजू जनतेला व्हावी. तसेच तळागाळातील विविध समाजातील घटकांपर्यंत पोहोचावी आणि कोणताही नागरिक न्यायापासून वंचित राहू नये याकरिता सदर महामेळावा आयोजित करण्यात असल्याचे न्यायाधीश सावंत म्हणाले.
रायगड जिल्ह्यामधील माझ्या कारकिर्दीतील सदर दुसरा महामेळावा असून अशा महामेळाव्याच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत कायदेविषयक ज्ञान पोहोचविणे, दुर्बल घटकांना न्याय मिळवून देणे असा मुख्य उद्देश असल्यामुळे महामेळावा अतिशय महत्वाचा आहे. उच्चशिक्षित व्यक्तींनाही कायद्याचे ज्ञान नसते. त्यामुळे ‘राष्ट्रीय विधी सेवा समिती'ने भविष्यात शालेय स्तरावर कायद्याची तोंड ओळख देणारे विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करावेत, असे मत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यावेळी व्यक्त केले.
महामेळाव्यात शासनाच्या विविध विभागांचे ३२ स्टॉल लावण्यात आले असून प्रत्येक विभागांनी आपल्या असलेल्या योजनांची तातडीने, तळमळीने अंमलबजावणी करुन योजनेचा लाभ तळागाळातील दुर्बल घटकांपर्यंत पोहचवावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात नवनवीन प्रकल्प येत असून तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीमुळे भविष्यात रायगड जिल्हा विकासाचा केंद्र बिंदू म्हणून ठरणार आहे. याचवेळी त्यांनी महसूल खात्याकडून राबविल्या जाणाऱ्या विविध महत्त्वकांक्षी योजनांची जिल्हाधिकारी जावळे यांनी सखोल माहिती दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी मनोगतातून सामान्य प्रशासनाच्या विविध प्रकारच्या कर वसुलीमध्ये ‘लोक अदालत'चा होणारा उपयोग सांगितला. तसेच त्यांच्या प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि ग्रामीण भागातील बचत गटांचे कार्य तसेच इतर बाबतीत महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी पोलीस विभागांकडून राबविण्यात येणारे कायदे आणि त्याची अंमलबजावणी याबाबत उपस्थितांना माहिती दिली.
या कार्यक्रमात शासनाच्या विविध खात्यांमधील लाभार्थ्यांना धनादेश तसेच वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘समिती'च्या सचिव तेजस्विनी निराळे यांनी केले.