प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
‘नमुंमपा'च्या उद्यान विभागात १०० कोटींचा घोटाळा
घोटाळ्याची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी
नवी मुंबई: मागील ५ वर्षात नवी मुंबई महापालिकेच्या गार्डन विभागाने खेळणी, ओपन जिम साहित्य खरेदी आणि दुरुस्तीच्या टेंडर सह सर्व समावेशक टेंडरमध्ये १०० कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप ‘मनसे'ने केला आहे.
२०२४ च्या गार्डन विभागाच्या ५ कोटींच्या टेंडरमध्ये ३०० टक्के चढ्या दराने ओपन जिमचे साहित्य खरेदी करण्यात आले आहे. नवी मुंबई महापालिकेंने ज्या कंत्राटदाराकडून ओपन जिमचे साहित्य खरेदी केले, त्याच कंत्राटदाराकडून त्याच साहित्याबाबत दरपत्रक मागवले असते या साहित्य खरेदीतील फरक ‘मनसे'च्या निदर्शनास आला. त्याचबरोबर साहित्य दुरुस्ती साठी २०२४ मध्ये काढण्यात आलेली ५ कोटींच्या निविदेत सुध्दा रंगकाम, बेअरिंग दुरुस्तीसाठी हजारो रुपये मार्केट भावापेक्षा जास्त लावण्यात आल्याचे स्पष्ट झाले. यासोबतच मोरबे धरणाच्या ठिकाणी आणि नवी मुंबईत ५ कोटी झाडे लावण्याचे टेंडर काढले आहे. परंतु, सदरची झाडेच लावण्यात आली नसल्याची माहिती आहे. सर्वसमावेशक टेंडरसाठी सुध्दा १८ कोटी जास्त देऊन उद्यान विभागाने कंत्राटदारांचे उखळ पांढरे केल्याची धवकादायक बाब मनसे'ने उजेडात आणली आहे. एका वर्षात सदरचा घोटाळा ३० कोटींचा होतो आणि ५ वर्षाचा हिशोब केला तर तो १०० ते १५० कोटींपर्यंत जाईल, असे मनसे'ने म्हटले आहे.
एअर वॉकर महापालिकेने एका कंत्राटदाराकडून कडून ८९,८९३ रुपयात घेतला तर त्याचा बाजारभाव त्याच कंत्राटदाराकडून २४,६५० रुपये आहे. म्हणजे ६५,२४३ रुपये जास्त दर एका साहित्यासाठी लावला आहे. महापालिकेने हिप टि्वस्टर ५९,४६५ रुपयांना, फोर आर्म व्हील ५४,०३५ रुपयांना, शोल्डर एवझरसाईज १३७,९१८ रुपयांना, एबीएस बोर्ड ७३,१७७ रुपयाला, एअरो रायडर ८२,६८३ रुपयांना खरेदी केले. तर याच हिप टि्वस्टरचा बाजारभाव २४,८०० रुपये, फोर आर्मचा बाजारभाव २१,४०० रुपये, शोल्डर एवझरसाईजचा बाजारभाव ३८,००० रुपये आणि एअरो रायडरचा बाजारभाव २०,५०० रुपये आहे. त्याचप्रमाणे उद्यानामधील साहित्याच्या दुरुस्ती आणि रंगरंगोटीमध्ये सुध्दा असेच चढे दर लावण्यात आल्याची बाब मनसे'ने निदर्शनास आणली आहे.
एअर वॉकर ज्याचा दर २४,६५० रुपये आहे, त्याच्या बेअरींग दुरुस्तीचा खर्च १२,८४८ रुपये लावण्यात आला आहे. हिप टि्वस्टर जे २४,८०० रुपयांना मिळते, त्याच्या दुरुस्तीचा खर्च १३,९३१ रुपये लावला आहे. ३ व्यक्ती बसतील असा बेंच निखळायला १२,००२ रुपये खर्च लावला आहे. तर या बेंचला रंग देण्याचा खर्च १३,४९३ रुपये लावला आहे.
दुसरीकडे नवी मुंबई ‘पलेमिंगोचे शहर' म्हणून ओळखले जाते. एकीकडे ‘पलेमिंगो'चा अधिवास आहे ती जागा बिल्डरच्या संगनमताने विकण्याचा घाट महापालिकेने घातला आहे. तर दुसरीकडे शहर भर जे ‘पलेमिंगो'चे शिल्प लावले आहेत, त्या एका शिल्पाची किंमत तब्बल ९०,२०२ रुपये आहे. तर एका वाघाचे शिल्प १०,११४ रुपये आणि एका सिंहाचे शिल्प १,२६,४९४ रुपये लावण्यात आली आहे. एवढी किंमत खर्च करुन तर जिवंत प्राणी विकत घेऊन नवी मुंबईत एखादे भव्य प्राणी संग्रहालय उभे करता आले असते, अशी खरमरीत टीका गजानन काळे यांनी पत्रकार परिषद मध्ये केली.
उद्यान विभागाच्या अनेक कामात तेच ते कंत्राटदार असल्याचे आढळून आले आहे. गार्डन विभागात भ्रष्टाचाराचे एवढे आरोप होत असताना असे का होत आहे? महापालिकेने उद्यान विभागातील खर्चाची संपूर्ण माहिती वेबसाईटवर टाकली पाहिजे. या सर्व प्रकरणाची चौकशी करुन त्याचे स्वतंत्र त्रयस्थ संस्था मार्फत लेखा परीक्षण करुन त्याचा अहवाल नागरिकांना उपलब्ध करुन दिला पाहिजे. तसेच या घोटाळ्यातील दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे. त्यामुळे उद्यान विभागाची श्वेतपत्रिका काढली पाहिजे.
-गजानन काळे, प्रवक्ते तथा शहर अध्यक्ष, मनसे.