उल्हासनगरच्या विकासासाठी शिवसेना कटिबध्द -उपमुख्यमंत्री शिंदे

उल्हासनगर : मी केवळ आश्वासने द्यायला नाही, तर प्रत्यक्ष काम करायला आलो आहे. उल्हासनगर मधील सर्व धोकादायक इमारतींचा क्लस्टर डेव्हलपमेंटद्वारे पुनर्विकास करुन नागरिकांना सुरक्षित आणि सुसज्ज घरे मिळवून देणे हाच माझा शब्द आहे, असा ठाम निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘शिवसेना, टीम ओमी कलानी, साई पक्ष आणि आरपीआय (आठवले गट) महायुती'च्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित ‘विजय संकल्प सभा'मध्ये उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. गोल मैदान येथे ९ जानेवारी रोजी झालेल्या या सभेत शिंदे यांनी सिंधी आणि मराठी बांधवांच्या एकतेचा गौरव करत विकासाच्या मुद्द्यावर भर दिला.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणातून शहरासाठी केलेल्या कामांचा पाढा वाचला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून उल्हासनगरच्या विकासासाठी आतापर्यंत १४०० कोटींचा निधी देण्यात आला असून रस्ते, ड्रेनेज लाईन आणि पाणीपुरवठ्यासाठी कोट्यवधींच्या योजना मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः २०० खाटांचे सुपर स्पेशालिटी कॅशलेस हॉस्पिटल सुरु झाल्यामुळे शहरातील गरीब रुग्णांना आता उपचारासाठी ठाण्याकडे धाव घेण्याची गरज उरली नसल्याचे त्यांनी नमूद केले. मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षांत कधी विश्रांती घेतली नाही, तर लोकांच्या हितासाठी काम केले. आताही नगरविकास आणि गृहनिर्माण खात्याच्या माध्यमातून उल्हासनगरला निधीची कोणतीही कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

महिलांच्या सक्षमीकरणावर बोलताना त्यांनी ‘लाडकी बहीण' योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, असे स्पष्ट केले. याप्रसंगी माजी आमदार पप्पू कलानी, शिवसेना महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी ,अरुण आशान, राजेंद्रसिंह भुल्लर, ओमी कलानी, सुमित चक्रवर्ती, जमनु पुरुसवानी, महेश सुखरामानी, कमलेश निकम, जीवन ईदनानी मनोज लासी, जयदीप कवाडे, नाना बागुल, प्रमोद टाले, संतोष पांडे यांच्यासह ‘महायुती'चे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि उमेदवार उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

निवडणुकीचे काम कर्मचाऱ्यांनी पारदर्शी करावे -आयुक्त चितळे