सक्षम नसलेल्या महिला भगिनींना राजकीय, सामाजिक आणि आर्थिक बळ देवू

नवी मुंबई : पतीच्या खांद्याला खांदा लावून आपल्या संसाराचा गाडा ओढत असताना सक्षम नसलेल्या महिला भगिनींना, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक बळ देवून त्यांना खऱ्या अर्थाने समानतेच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी वाशी येथे केले. 

महिला आर्थिक विकास महामंडळाची (माविम) यशस्वी ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल माविम सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून नवी मुंबईतील वाशी सिडको प्रदर्शन केंद्र येथे झालेल्या “माविम सुवर्ण महोत्सव- नव तेजस्विनी २०२५” च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 

२० ते २५ मार्च २०२५ या कालावधीत ग्रामीण भागातील बचतगटांनी तयार केलेल्या विविध वस्तू, खाद्यपदार्थ, गृहउपयोगी साधन सामग्री असलेल्या जिल्हास्तरीय माविम "सुवर्ण महोत्सव- नव तेजस्विनी २०२५"  प्रदर्शनाचे उद्घाटन ना. गणेश नाईक यांच्या शुभहस्ते झाले. सुरुवातीस नाईक यांनी प्रदर्शनाची पाहणी केली व स्टॉलला भेटी देवून स्टॉलमध्ये विक्रीकरिता ठेवण्यात आलेल्या वस्तू व पदार्थांची माहिती घेतली. 

या सोहळ्याप्रसंगी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार प्रशांत ठाकूर, महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव,  विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक वर्षा  लड्डा-उंटवाल, महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आव्हाडे, इफाड च्या राष्ट्रीय समन्वयक मीरा मिश्रा, शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी तसेच महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांहून आलेल्या बचतगटांच्या महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. 

वनमंत्री गणेश नाईक हे उपस्थित सर्व महिलांना माविम च्या सुवर्णमोहोत्सवी दिनाच्या शुभेच्छा देत म्हणाले की, आदिती तटकरे आणि मेघना साकोरे- बोर्डीकर या दोन महिला मंत्र्यांच्या नेतृत्वाने माविम च्या ५० व्या सुवर्णमहोत्सवी वर्षाला उत्तम गती मिळेल.  

नाईक पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी महिलांना सक्षम करण्याची फक्त इच्छाच व्यक्त केली नाही, तर त्यानुषंगाने दमदार पावलेदेखील उचलली आहेत. महिलांना पाण्यासाठी वणवण फिरायला लागू नये, यासाठी जलजीवन मिशन युध्दपातळीवर राबविण्यात आले. अन्न, वस्त्र, निवारा आणि महिलांचा सन्मान यानुषंगाने पंतप्रधान मोदी यांची भूमिका सकारात्मक आहे. महाराष्ट्र राज्यात जेव्हा महिलांच्या विकासासाठी काही अपेक्षा केली तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह सर्व मंत्रीमंडळाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. जोपर्यंत महिला सक्षम होत नाही तोपर्यंत कुटुंब सक्षम होत नाही, असे म्हणत येणाऱ्या कालखंडात महिला अधिक सक्षम होतील, असा विश्वास गणेश नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. 

ना. आदिती तटकरे म्हणाल्या की, माविमचा सुवर्ण महोत्सव आपण आज साजरा करू शकलो कारण माविमच्या प्रत्येक घटकाने माविमच्या यशासाठी मोलाचा वाटा उचलला आहे. खऱ्या अर्थाने सगळ्यांचे कष्ट आणि माविमला प्रतिसाद देणारी प्रत्येक महिला ही आजच्या या सोहळ्याची तितकीच समान मानकरी आहे, जितकी या विभागाची प्रतिनिधी म्हणून मी आहे.  माविमला यशस्वी करण्यासाठी खूप कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला आणि आज माविम मधे २० लाखांहून अधिक महिला साहभागी झाल्या आहेत. माविमला केवळ राज्य अन् राष्ट्रीय स्तरावरच नाही तर थेट आंतरराष्ट्रीय स्तरावरही सन्मानित कऱण्यात आले आहे. सगळ्या बचतगटांच्या चळवळीत माविमच आयडियल मॉडेल आहे. माविम कोणावरही अवलंबून न राहता महिलांना कर्ज देते.  माविमच्या महिला बचतगटांचा कर्ज परतफेडीचा दर ९९.०५ टक्के आहे. याचा मला अभिमान आहे, असे सांगून आदिती तटकरे यांनी माविमच्या महिलांचे अभिनंदन केले. 

त्या पुढे म्हणाल्या, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांवर प्रत्येक ३५ ते ५० किलोमीटरच्या अंतरावर महिलांसाठी स्वच्छ सुंदर शौचालये बांधण्यात यावे आणि त्या शौचालयाच्या जवळपास स्टॉल उपलब्ध करून दिल्यास माविमच्या माध्यमातून त्या स्टॉलवर होणाऱ्या उत्पादनांच्या विक्रीतून शौचालयांच्या देखभालीचा खर्च भागविला जावू शकतो. तसेच महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून उमेद प्रमाणे तालुक्याच्या प्रत्येक नगरपंचायतीच्या बाजारपेठेच्या ठिकाणी माविमचे स्वतंत्र अस्मिता भवन उभारण्यात येईल, असा प्रस्तावच शासनाकडे सादर करण्यात आला आहे. 

राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी नुकत्याच अंतराळात ९ महिने राहून पृथ्वीवर परतलेल्या सुनिता विल्यम्स यांचा दाखला देत स्त्रीशक्तीच्या इच्छाशक्ती आणि चिकाटीचे महत्त्व अधोरेखित केले. माविमच्य महिलांचे कष्ट आणि त्यांच्या यशकथा पाहून मला अभिमान वाटतो, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी माविम च्या माध्यमातून उद्योगक्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या रमा कांबळे, स्वाती विठ्ठल शेळके, वैशाली वसंत पाटील, रोहिणी भानुदास कुसमागडे, शशिकला नारायण डांगे, मंजुताई राजेंद्र ठाकरे, संगिता कोळी या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.  

तसेच माविमच्य महिला बचतगटांच्या यशकथा तसेच त्यांची उत्पादने याची माहिती असणाऱ्या एकूण ३ कॅटलॉगचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

प्रास्ताविकपर भाषणात विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी माविम बद्दल सविस्तर माहिती दिली.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘इमॅजिका पार्क'ने शालेय सहली कायमच्या बंद कराव्यात; अन्यथा आंदोलन