कर्करोग निदान उपक्रमाला ठाणे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ‘ठाणे जिल्हा परिषद' तर्फे राबविण्यात येत असलेल्या कर्करोग निदान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, ठाणे जिल्ह्यात फिरत असलेली कर्करोग डायग्नोस्टिक व्हॅन अल्पावधीत हजाराेंपर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचली आहे. ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि ‘ठाणे जिल्हा परिषद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्करोग निदान उपक्रम नोव्हेंबर महिन्यात राबविण्यात आला.

कर्करोगाचे लवकर निदान करुन नागरिकांना तात्काळ उपचाराखाली आणणे, मार्गदर्शन करणे तसेच कर्करोगाविषयी जागरुकता वाढविणे, कर्करोग निदान उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. कर्करोगाचे वेळेत निदान झाल्यास उपचार अधिक परिणामकारक होतात, या कारणामुळे कर्करोग निदान उपक्रम ठाणे जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरला आहे, असे ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले.

ठाणे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये फिरलेल्या कर्करोग डायग्नोस्टिक व्हॅन मधील आरोग्य पथकाद्वारे मुख कर्करोग, स्तन कर्करोग आणि गर्भाशय मुख कर्करोग या प्रमुख तीन कर्करोगाची मोफत तपासणी करण्यात आली. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या पाच तालुक्यांमध्ये नियोजित वेळापत्रकानुसार नागरिकंाची मोफत कर्करोग तपासणी पार पडली.कर्करोग डायग्नोस्टिक व्हॅन सेवेमुळे अल्पावधीत मोठ्या प्रमाणावर नागरिकांपर्यंत मोफत कर्करोग तपासणी सुविधा पोहोचली असून, कर्करोग निदान उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.

तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका यांनी गावोगाव नागरिकांना कर्करोग निदान उपक्रमाविषयी माहिती देऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि ग्रामपंचायतींचा देखील कर्करोग निदान उपक्रम राबविण्यात सक्रिय सहभाग होता. ग्रामीण भागातील महिलांना आणि सर्वसाधारण नागरिकांना सहज उपलब्ध तपासणी सुविधा, कर्करोगाबाबतची भीती आणि गैरसमज कमी करणे, लवकर निदानामुळे उपचार सुलभ आणि परिणामकारक करणे, आरोग्य जागरुकतेद्वारे समाजात सकारात्मक बदल घडविण्याचे महत्त्वाचे कामकाज कर्करोग निदान उपक्रमात करण्यात आले आहे, असे  ‘ठाणे जिल्हा परिषद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे  यांनी सांगितले.

ठाणे जिल्ह्यातील ५१४३ नागरिकांची ३ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत मोफत कर्करोग तपासणी करण्यात आली. त्यामध्ये २४४१ नागरिकांची मुख कर्करोग तपासणी,  १४९२ महिलांची स्तन कर्करोग तपासणी आणि १२१० महिलांची गर्भाशय मुख कर्करोग तपासणी करण्यात आली. यापैकी तपासलेल्या नमुन्यांमध्ये ५ मुख कर्करोग संशयित, ३४ स्तन कर्करोग संशयित आणि १४ गर्भाशय मुख कर्करोग संशयित मिळून एकूण ५३ व्यक्ती संशयित कर्करुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ८ जणांचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. - डॉ. गंगाधर परगे, आरोग्य अधिकारी - ठाणे जिल्हा. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

चिपळे पूल ते नेरे रस्ता दुरुस्ती कामाला सुरुवात