विमानतळावर सुरक्षिततेसाठी स्वतंत्र वाहतूक पोलीस शाखेची गरज

नवी मुंबई : लवकरच सुरु होणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात वाहतुकीचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहणार आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस शाखेसाठी स्वतंत्र १७७ पदनिर्मिती करण्याची मागणी नवी मुंबई पोलिसांकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून सविस्तर प्रस्ताव पोलीस महासंचालक कार्यालयास सादर करण्यात आला आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर या परिसरात ४ प्रवासी टर्मिनल, २ धावपट्ट्या, १ ट्रक टर्मिनल, कार्गो हब, विमान कंपन्यांची कार्यालये, बँका, हॉटेल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स तसेच संरक्षण आणि हवामान विभागाशी संबंधित महत्त्वाच्या आस्थापना उभारल्या जाणार आहेत. यामुळे देश-विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या तसेच आयात-निर्यात होणाऱ्या मालवाहतुकीत प्रचंड वाढ अपेक्षित आहे. परिणामी, परिसरातील लोकसंख्या आणि व्यावसायिक हालचालींमध्येही झपाट्याने वाढ होणार आहे.

कायदा-सुव्यवस्थाचे आव्हान...
विमानतळ परिसरात कार्यरत राहण्यासाठी हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष, बॉम्ब शोधक-नाशक पथके, अग्निशमन दल, रुग्णालये अशी आवश्यक यंत्रणा उभारली जाणार आहे. तसेच कार्गो हब कार्यान्वित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक वाढेल.

खारघर, तळोजा, कामोठे, कळंबोली, रोडपाली, पळस्पे, पनवेल, करंजाडे, उलवे, उरण, द्रोणगिरी अशा भागात सुरु असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, भविष्यात गुन्हेगारीचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे विमानतळ पोलीस ठाणे आणि वाहतूक शाखा मिळून एकूण ३९५ नवीन पदांची आवश्यकता असल्याचे पोलिसांचे मत आहे.

वाहतुकीवर प्रचंड ताण...
विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर अंदाजे ३६० कोटी मेट्रिक टन मालवाहतूक आणि ९ कोटी प्रवासी वाहतूक प्रतिवर्ष अपेक्षित आहे. ठाणे, तुर्भे, बेलापूर, तळोजा येथील औद्योगिक वसाहती, जेएनपीटी बंदर, अटल सेतू, प्रस्तावित कोस्टल रोड, ४ मेट्रो मार्ग, लोकल रेल्वे, हायस्पीड रेल्वे या सर्वांमुळे वाहतुकीचा प्रचंड ताण वाढणार आहे. परिणामी, वाहतूक कोंडी आणि सुरक्षिततेची समस्या उद्‌भवणार असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र वाहतूक पोलिसांची आवश्यकता भासणार आहे.

उलवे पोलीस ठाणे मनुष्यबळाची प्रतिक्षा...
विमानतळ परिसरातील काही गावांचा समावेश उलवे आणि पनवेल शहर पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात येतो. मात्र, उलवे पोलीस ठाण्याला अद्याप शासनाकडून मनुष्यबळ मंजूर झालेले नाही. उलव्यासह आजूबाजुच्या भागात वाढत्या बांधकाम प्रकल्प आणि लोकसंख्या लक्षात घेता विद्यमान पोलीस ठाण्यांमधून मनुष्यबळ कमी करणे शक्य नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पोलिसांची अंतिम मागणी...
यापूर्वी विमानतळ पोलीस ठाणेसाठी २१६ पदांचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठविण्यात आला होता. मात्र, वित्त विभागाने पहिल्या टप्प्यात ५० टक्के म्हणजे १०८ पदे मंजूर करण्याची सूचना केली आहे. यामुळे नवी मुंबई पोलिसांनी आता विमानतळ पोलीस ठाण्यासाठी १०८ पदे आणि वाहतूक शाखेसाठी आवश्यक सर्व १७७ पदे तातडीने मंजूर करण्याची मागणी केली आहे.

नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर विमानतळ आणि आजूबाजुच्या परिसरामध्ये वाहतुकीचा प्रचंड ताण वाढणार आहे. परिणामी, वाहतूक कोंडी आणि सुरक्षिततेची समस्या उद्‌भवणार आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र वाहतूक शाखेची आवश्यकता आहे. त्यामुळे विमानतळ पोलीस ठाणेसाठी १०८ पदे आणि वाहतूक शाखेसाठी आवश्यक १७७ पदे तातडीने मंजूर करण्याची मागणी पोलीस महासंचालकांमार्फत शासनाकडे करण्यात आली आहे. येत्या काही दिवसामध्ये या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
-संजय कुमार पाटील, पोलीस उपायुक्त-मुख्यालय, नवी मुंबई. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

टुथब्रश-टमरेल घेऊन नागरिकाचे आयुक्त कार्यालयात आंदोलन