मराठी भाषा अभिजात झाल्याने बोलींना मान्यता - कवी अरुण म्हात्रे

ठाणे : आपल्या मातृभाषेत एक ममत्व असते. त्यामुळे आपली भाषा बोलणारा माणूस भेटला की, आपण त्याच्याशी सहजपणाने जोडले जातो. आपली मराठी भाषा अशीच ममत्वाची भाषा असून ती विविध बोलींनी समृध्द केलेली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे काय.. तर या महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात बोलल्या जाणाऱ्या सगळ्या बोलींना मान्यता मिळाली, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी येथे केले.

मराठी भाषा पंधरवडा निमित्त ठाणे महापालिकेच्या वतीने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांचे ‘जगणे व्हावे गाणे' या विषयावर गाणी आणी संवाद या कार्यक्रमाचे आयोजन २२ जानेवारी रोजी करण्यात आले. या कार्यक्रमास उपायुक्त उमेश बिरारी, प्र. उपमाहिती-जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह ठाणे महापालिकेच्या विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कवी अरुण म्हात्रे यांचा सन्मान उपायुक्त उमेश बिरारी यांनी केला.

मराठीला यावर्षी अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल ते म्हणाले, २ हजार वर्षांहून अधिक काळ जिवंत असलेली सदर भाषा आपल्या आई-वडिलांची, पूर्वजांची आणि पुढील पिढ्यांची ओळख आहे. सदरचा सन्मान म्हणजे मराठी संस्कृतीच्या दीर्घ परंपरेला मिळालेली पावती आहे. परदेशात एखादा मराठी माणूस बोलताना ऐकला की, क्षणात परकेपणा नाहीसा होतो. मराठी भाषेची आपुलकी शब्दांत मावणारी नाही, असे ते म्हणाले.

भाषा केवळ संवादाची साधन नसून ती माणसाची ओळख, आठवणींचा ठेवा आणि भावनांचे घर असते. आपल्या भाषेतील एक शब्दही माणसाला आपल्या मुळांशी जोडून ठेवतो. यावेळी त्यांनी मराठीच्या विविध बोलीभाषांचा उल्लेख केला. मालवणी, अहिराणी, वऱ्हाडी, कोकणी अशा अनेक बोलीभाषा म्हणजे मराठीच्या समृध्दीचे रंग आहेत. शब्द वेगळे असले तरी भावना एकच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. अनेकांना आपल्या बोलीभाषेत बोलताना लाज  वाटते. परंतु, भाषेबद्दल लाज वाटणे योग्य नसून ती आपली ताकद आहे. कविता जशी शब्दांतून जीवन रंगवते, तशीच भाषाही माणसाच्या जगण्याला अर्थ देत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कवी आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टीचे वर्णन आपल्या कवितांमध्ये करत असतो. कोकणातील पावसाचे सौंदर्य, मातीचा सुगंध, समुद्राची किनार असे चित्रण कवी मंगेश पाडगांवकर त्यांच्या ‘वेंगुर्ल्याचो पाऊस' या कवितेत केले असल्याचे सांगत त्यांनी कविता सादर केली.

यावेळी त्यांनी अनेक  कवींच्या कवितांवर भाष्य केले. नारायण सुर्वे यांच्या कविता म्हणजे उपेक्षितांचे बोलके दुःख आणि कष्टकरी माणसांच्या जगण्याचा आरसा असल्याचे त्यांनी नमूद केले. अनेक कविता या मुर्खेद्‌गत असल्याचे सांगत त्यांनी त्यांची ‘उंच माझा झोका' कविता सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.

मराठी भाषा पंधरवडा निमित्त ‘ठामपा'च्या वतीने २७ जानेवारी रोजी सायं. ४ वाजता कवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तर मराठी भाषा पंधरवडा समारोपादिवशी २८ जानेवारी रोजी महापालिका भवन येथून ‘ग्रंथदिंडी'चे काढण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ‘ठामपा'तर्फे करण्यात आले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई महानगरपालिका ‘ॲक्शन मोड’वर