म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
‘कुळगांव-बदलापूर नगरपरिषद'चा ६१९ कोटींचा अर्थसंकल्प सादर
बदलापूर : ‘कुळगांव-बदलापूर नगरपरिषद'चे सन २०२४-२५ चे सुधारित आणि सन २०२५-२६ चे अंदाजपत्रक प्रशासक तथा मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांना लेखापाल विकास चव्हाण यांनी २४ फेब्रुवारी रोजी सादर केले. या अर्थसंकल्पामध्ये एकूण जमा ६१९.५७ कोटी रुपये तसेच खर्च ६१९.५२ कोटी रुपये आणि शिल्लक रुपये ५.०४ लक्ष रुपये असून सदर अर्थसंकल्पामध्ये कोणतीही कर वाढ सुचवण्यात आलेली नाही.
‘कुळगांव-बदलापूर नगरपरिषद'ने अर्थसंकल्पामध्ये काही महत्त्वाच्या तरतुदी सुचवल्या असून रस्ते बांधणीसाठी २.५० कोटी रुपये, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना (जिल्हास्तर) ५० कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. तसेच महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (राज्यस्तर) १०० कोटी, घनकचरा व्यवस्थापन ३४ कोटी आणि आपत्ती व्यवस्थापन २५ लक्ष अशी अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे.
तसेच शहरातील नागरिकांसाठी काही विशेष तरतुदी सुचविण्यात आलेल्या आहेत. यामध्ये महिला-बालकल्याण साठी १.३९ कोटी, दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी १.३९ कोटी तसेच ज्येष्ठ नागरिकांना सेवा-सुविधा पुरविण्यासाठी १० लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे .
सदर अर्थसंकल्प सादर करताना ‘कुळगांव-बदलापूर नगरपरिषद'चे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. सदर अर्थसंकल्प अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकारी, ठाणे यांना सादर करण्यात आला आहे.